मुंबई : पूर्वकल्पना न देता इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पहिली आणि दुसरीच्या फीमध्ये हिंदू कॉलनीतील आयइएस शाळेने थेट दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे पालकांनी महापालिकेच्या शिक्षण समितीकडे धाव घेतली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेऊन पहिली, दुसरीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय सोमवारी शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आयइएस पद्माकर ढमढेरे या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेची इयत्ता पहिली आणि दुसरीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणतीही पूर्व कल्पना न देता फी थेट ४० ते ४२ हजार रुपये केल्याने पालकांनी या वाढीला विरोध दर्शवला. शुल्कात केलेली वाढ कमी करावी, यासाठी ६ एप्रिल रोजी पहिल्यांदा इयत्ता पहिलीच्या ‘चिल्ड्रन्स पेरेन्टस फोरम’ने शाळा प्रशासनाला अवाजवी शुल्क वाढीसंदर्भात एक पत्र लिहिले. १३ एप्रिल रोजी फोरम आणि शाळा प्रशासनाची बैठक झाली. त्यावेळी प्रवेश शुल्कात करण्यात आलेली वाढ अवाजवी आहे. अशी वाढ करायची असल्यास शाळेच्या संकेतस्थळावर सहा महिने आधी माहिती देणे अथवा नोटीस बोर्ड लावणे आवश्यक आहे, असे प्रशासनाला सांगण्यात आले. पण, त्यावर केलेली वाढ योग्य असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले, असे फोरमचे सचिव सव्यसाची गिरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गिरी म्हणाले, १३ एप्रिलला झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर शाळा प्रशासनाने २३ एप्रिलला पालकांना चर्चेसाठी पुन्हा शाळेत बोलावले होते. त्यावेळी शाळा प्रशासनाने चर्चाच केली नाही. अधिकारी उपस्थित नसल्याची सबब पुढे करत, चर्चा केली नाही. त्यानंतर पालकांनी एकत्र येऊन शिक्षण समितीकडे पत्र पाठवले. त्यानंतर तत्काळ सोमवार २५ एप्रिलला शिक्षण समितीने बैठक घेतली. या बैठकीत शिक्षण समिती सदस्य, पालक, शाळा प्रशासनाचे अधिकारी, मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी नियमाप्रमाणे शुल्कात १५ टक्के, १० टक्के वाढ करण्यात यावी. पण, शाळेने केलेली शुल्कवाढ अवास्तव आहे. पालकांची लूट होत आहे. ३० हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले तरी चालेल, असे शाळेला सांगितले आहे. पण, शाळा प्रशासन शुल्क कमी करत नाही, असे समितीसमोर सांगितले. (प्रतिनिधी)
शाळेची फी अचानक दुप्पट
By admin | Published: April 27, 2016 2:46 AM