ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 16 - शालेय पोषण आहार वितरणात अनियमितता आणि मुख्याध्यापकाची सततची गैरहजेरी याला कंटाळून शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी मालेगावची जिल्हा परिषद ऊर्दू शाळा सोमवारी मालेगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिका-यांच्या कार्यालयात भरविली.
मालेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक ऊर्दू शाळा गांधीनगर येथे इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार नियमित मिळत नाही तसेच मुख्याध्यापिका यास्मीन तब्बसूम शेख निसार या सतत विनापरवानगी गैरहजर राहतात, असा आरोप शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी केला. गत ३ जानेवारीपासून येथे शालेय पोषण आहार शिजवल्या गेला नाही. मदतनीस अनुदान, सादिल अनुदान, पुस्तक अनुदान, शाळा अनुदान, शिक्षक अनुदान वाटप झाले नाही, शाळा व्यवस्थापन समितीचे नागरिक सभेसाठी येतात. मात्र ती सभा होत नाही आणि झाली तरी मुख्यद्यपिका म्हणेल तोच ठराव मांडल्या जातो, अशी तक्रार पालकांनी शिक्षण विभागाकडे केली. उपरोक्त प्रकारचा निषेध आणि या बाबींमुळे वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी जिल्हा परिषद ऊर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकाºयांच्या कार्यालयात आणले आणि याप्रकरणी ठोस कारवाई करण्याची मागणी केली. प्रभारी गट विकास अधीकारी संजय महागवकर, सभापती गवई, केंद्रप्रमुख मो. यामीन, अख्तार खाँ पठाण यांच्यासह अनेक पालक, महिला व विद्यार्थी उपस्थित होते. कारवाई होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका पालक व विद्यार्थ्यांनी घेतली. गटशिक्षणाधिकारी नसल्याने वाशिम येथून उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांना बोलाविण्यात आले. त्यानंतर उपशिक्षणाधिकाºयांशी चर्चा करून मुख्याधिपिकेला पुढील आदेशापर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय झाला आणि सोमवारपासूनच शालेय पोषण आहार शिजविणे सुरू केले. शाळेचा प्रभार ज्येष्ठ शिक्षकाकडे सोपविण्यात आला.