ऑनलाइन लोकमतधुळे, दि.07 - खेड्यावरुन साक्री येथे शाळेत येणाऱ्या शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारायला गेलेल्या मुलीच्या भावाला दम देणाऱ्याच्या विरोधात एस.टी. आगारातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिसांनी हस्तक्षेप करुन एस.टी. बस पोलीस स्टेशनला नेवून मुलीची तक्रार नोंदवून घेतली असून छेड काढणाऱ्या व त्याचा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे बसस्थानकामध्ये काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. या प्रकारामुळे मुलींच्या पालकांनी बसस्थानकावर दररोज छेडखानीच्या घटना वाढल्याने टारगटांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.साक्री तालुक्यातील ग्रामीण भागातून शाळेत व महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींचे प्रमाण जास्त आहे. शाळा व महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची बसस्थानकावर मोठी गर्दी असते. यावेळेत टारगट व काही गुंडप्रवृत्तीची मुले बसस्थानकावर आलेल्या मुलींची छेड काढतात. त्यामुळे मुली भेदरलेल्या असतात. छेड काढणाऱ्या गुंडांच्या विरोधात कुणी बोलायला गेले तर उलट दमबाजी करुन प्रसंगी मारहाण केली जाते. हा प्रकार दररोज होत असल्याने मुली व पालक वैतागले आहेत.असाच प्रकार शुक्रवार ७ रोजी दुपारी १२ वाजता घडला. माळमाथा भागातून आलेल्या मुली शाळा सुटल्यानंतर बसस्थानकावर आल्या होत्या. त्यातील एका मुलीची छेड टारगट मुलाने काढली. या प्रकारानंतर त्या मुलीच्या भावाने त्याला जाब विचारला. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना तेथे बोलवून त्या मुलाला व मुलीला दम दिला. हा प्रकार बसस्थानकातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या टारगट मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, ते टारगट मुले तेथून पळून गेले. तोपर्यंत इतर मुलींनीही तक्रारी केल्या. पोलिसांना घटना समजल्यावर त्यांनी साक्री-लामकानी ही बस पोलीस स्टेशनला नेली. तेव्हा पिडीत मुलगी रडत होती. पोलिसांनी तिची समजूत काढून तिला शांत केले. यावेळेस पोलीस स्टेशनच्या आवारात संतप्त पालकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरात मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढत असल्याचे यावेळेस पालकांनी व नागरिकांनी सांगितले. - साक्री शहरात ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थिनी येतात. मात्र, छेडखानीचे प्रकार वाढल्यामुळे मुली घाबरलेल्या आहेत. टारगट मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी शाळा व महाविद्यालय सुटल्यानंतर तेथील परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
साक्री बसस्थानकात शाळकरी मुलीची छेड
By admin | Published: October 07, 2016 6:54 PM