- सुरेंद्र राऊत
यवतमाळ- नववीत शिकणाऱ्या एका मुलीने त्रास देणाऱ्या मुलाचा बंदोबस्त करण्यासाठी खास शक्कल लढविली आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रियकराला तिने चक्क त्रास देणाऱ्या मुलाचा खून करायला सांगितल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे मुलाचा खून केला तर तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे, असं मी समजेन. असा दमही त्या मुलीने प्रियकराला भरला. मुलीला त्रास देणारा मुलगा हा तिच्याच शाळेतील आहे. पालकांच्या सतर्कतेने आणि दामिनी पथकाच्या समयसूचकतेने मोठा अनर्थ टळला.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ती मुलगी नवव्या वर्गात शिकते. त्याच शाळेतील दहावीतील एक विद्यार्थी तिला त्रास देत होता. याची तक्रार तिने आपल्या पालकाकडे केली. दरम्यान पालकांनी जिल्हा पोलीस दलाच्या दामिनी पथकाशी संपर्क साधला. मुलीला होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. दामिनी पथकाने मुलीचे समूपदेशन करीत असताना तिचा मोबाइल तपासला. त्यावेळी तिने त्रास देणाऱ्या शाळकरी मुलाला संपविण्यासाठी रचलेला कट उघडकीस आला. दामिनी पथकाने सदर मुलीच्या व्हॉटस्अॅपवरून झालेले चॅटिंग तपासले. यातून शाळकरी मुलीचे एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याशी असलेलं प्रेम प्रकरण उघड झालं. दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांनी हा गुंता सोडविण्यासाठी मुलीचा मित्र बनून तिच्या बॉयफ्रेन्डशी संपर्क साधला. तसेच जो मुलगा मुलीला त्रास देत होता, त्यालाही या मुलीच्या मोबाईलवरुन संपर्क करण्यात आला. या पद्धतीने या दोन्ही मुलांना पद्धतशीरपणे मोबाईलद्वारे ट्रॅप केले.
त्रास देणाऱ्या शाळकरी मुलाचा मलाही जुना हिशोब चुकता करायचा आहे, अशी ऑफर त्या मुलीच्या प्रियकरासमोर दामिनी पथकाने ठेवली. याला त्या मुलाकडूनु लागलीच प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे मंगळवारी सायंकाळी प्रियकराला फोनवरून पोस्टल मैदानावर बोलाविण्यात आले. तिथे तुझ्या प्रेयसीला त्रास देणारा मुलगा असल्याची बचावणी करण्यात आली. तत्पूर्वी एकतर्फी प्रेमातून मुलीला त्रास देणाऱ्या त्या शाळकरी मुलालाही बोलाविण्यात आलं होतं. या दोघांनाही नंतर ताब्यात घेतलं. दामिनी पथकाच्या प्रमुख विजया पंधरे यांनी ती मुलगी व ते दोन मुले या तिघांनाही पालकांच्या समक्ष किती मोठा गुन्हा ते करीत होते, याची जाणीव करून दिली. या तीनही मुलांचे वास्तव ऐकून पालकही सुन्न झाले. शेवटी सर्वांचेच समूपदेशन करून भविष्यात घडणारा मोठा अनर्थ टाळण्यात दामिनी पथकाला यश आले.
पालकांनी आपल्या मुलांबद्दल नेहमी जागरुक असणे गरजेचे आहे. मुलांकडे स्मार्ट फोन असेल तर त्याची तपासणी नेहमी केली पाहिजे, असा सल्ला दामिनी पथकाच्या प्रमुख विजया पंधरे यांनी दिला.