ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १९ : विद्या विलास मंडळा या शैक्षणिक संस्थेच्या चालकाच्या मुलीने एका गेस्ट लेक्चररला चक्क चपलेने मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडली. संस्थेच्या पदाधिका-यांमध्ये सुरु असलेल्या वादामधून हा प्रकार घडला असून पालक आणि विद्यार्थ्यांनी पोलीस चौकीवर मोर्चा काढून या मुलीवर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात सुरु होते.
गणेश पाटील असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. स्वप्ना ननावरे हिने त्यांना मारहाण केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थाचालक अंथनी ननावरे यांची स्वप्ना ही मुलगी आहे. संस्थेची विश्रांतवाडीमध्ये जनता हायस्कूल नावाची शाळा आहे. या शाळेत शिक्षकांची कमतरता असल्यामुळे मुख्याध्यापिकांनी पाटील यांना गेस्ट लेक्चरर म्हणून नेमले असून तसेच पत्रही दिलेले आहे. पाटील सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास शाळेमध्ये गेले असता अंथनी ननावरे आणि स्वप्ना हिने त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. राग अनावर झालेल्या स्वप्ना हिने पाटील यांना चपलेने मारहाण करायला सुरुवात केल्याने शाळेत गोंधळ उडाला.
संस्थाचालकांच्या या मुजोरीमुळे चिडलेल्या पालकांसह विद्यार्थ्यांनी पोलीस चौकीवर मोर्चा काढला. कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सर्वांनी केल्यावर पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पी. एन. सुपेकर यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून डबघाईला आलेल्या या संस्थेला वाचवण्यासाठी पाटील यांच्यासह अनेकजण प्रयत्न करीत असून त्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे यासंदर्भात याचिका केल्याचेही सुपेकर यांनी सांगितले.