ठाणे : राज्यघटनेनुसार राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना सौजन्याची वागणूक देण्यासह त्यांच्या विशेषाधिकारांची जाणीव राजपत्रित अधिकाऱ्यांना करून देण्यासाठी विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीच्या प्रमुख डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी ठाण्यात विशेष कार्यशाळा घेतली. त्यात कोकणातील सर्व अधिकाऱ्यांना राजशिष्टाचाराचे धडे देण्यात आले. येथील नियोजन भवनमध्ये घेतलेल्या या कार्यशाळेला कोकणातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिकांचे आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व विभागप्रमुख या वेळी उपस्थित होते. विशेषाधिकारात जसे सामर्थ्य आहे, तशा काही मर्यादाही आहेत, याचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. लोकप्रतिनिधींना चुकीची वागणूक मिळू नये, यासाठी अधिकाऱ्यांना जागरूक करण्यासाठी विधिमंडळ सचिवालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे.विधिमंडळ सदस्यांना शिष्टाचारानुसार वागणूक देणे, त्यांचे नाव निमंत्रणपत्रिकांवर टाकणे, व्यासपीठावर त्यांची बसण्याची योग्य व्यवस्था करणे, दूरध्वनी, मोबाइलवरून संभाषण करतांना त्यांना योग्य तो प्रतिसाद देणे, आदींकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. लोकप्रतिनिधींच्या अपमानानंतर संबंधितांना शिक्षा झाल्याची काही उदाहरणेही त्यांनी या वेळी सांगितली.
विधिमंडळाच्या सन्मानासाठी ‘शाळा’
By admin | Published: November 06, 2015 2:14 AM