नवी मुंबई : आठवडाभरातच नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार असल्याने शालेय वस्तू खरेदीकरिता बाजारपेठा सजल्या आहेत. शालेय साहित्यालाही महागाईची झळ बसली असून सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये दहा ते वीस टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येते. छोटा भीम, बार्बी, डोरेमॉन, शिनचॅन, बालगणेशा, हनुमान, बेनटेन आदी रंगीबेरंगी कार्टूनचे चित्र रेखाटलेल्या वस्तूंना वाढती मागणी आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी वह्या, पुस्तके, गणवेश, कंपास बॉक्स, दप्तर, पाण्याची बाटली या वस्तू खरेदीची लगबग बाजारपेठांमध्ये पहायला मिळत आहे. दोनशे रुपयांपासून ते तीन हजारपर्यंतचे दप्तर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. मुलांना दप्तराचे ओझे वाटू नये याकरिता वजनाने हलके तसेच चाके असलेल्या बॅगेलाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शाळेच्या दप्तराचा पावसापासून बचाव करण्यासाठी स्वतंत्र कव्हरही विक्रीसाठी उपलब्ध असून त्याची किंमत १०० ते ३०० रुपये इतकी आहे. शहरातील दुकानांमध्ये शाळेचे दप्तर, पाण्याची बाटली, खाऊचा डबा, कंपास बॉक्स यांचा एकत्रित संचही विक्रीसाठी उपलब्ध असून हा संपूर्ण संच आठशे ते दोन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. पाण्याच्या बाटल्यांच्याही किमती वाढल्या असून ६० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंतच्या बाटल्या बाजारात उपलब्ध आहेत. आडव्या बॅग हद्दपार झाल्या असून सॅकला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे पहायला मिळते. अनेक शाळांनी स्वत: शालेय वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या असून पालकांनी शाळेतूनच वस्तू खरेदी करण्याचा आग्रह केला जातो. नामांकित शाळांमध्ये विशेष दुकानातून खरेदीची अट घातल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अमुकअमुक दुकानातूनच गणवेश खरेदी करण्याचा अट्टाहास केल्याने पालकांना खिसा खाली करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
शालेय साहित्य १० ते २० टक्क्यांनी महागले
By admin | Published: June 11, 2016 2:46 AM