ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि . ४ - भायखळ्यामधील एका शाळेने परीक्षेआधी विद्यार्थीनींना बुरखा काढायला लावल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी ही घटना घडली आहे. परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपर लिहिण्याअगोदर या विद्यार्थिनींना बुरखा काढण्यास सांगण्यात आले. राज्य मंडळाच्या नियमानुसार ज्या विद्यार्थ्यांना बुरखा घालून परीक्षा द्यायची आहे त्यांची परीक्षा केंद्रावरील अधिका-यांनी तपासणी केल्यानंतर ते परीक्षा देऊ शकतात.
डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार इमरान हंसारी याने हा आरोप केला आहे. इमरान हंसारी याची बहिण या परीक्षेसाठी गेली असता तिला या परिस्थितीचा सामना करावा लागला. रात्रभर जागून अभ्यास केल्यानंतर माझी बहिण परिक्षेला जाताना परवानगी असेल म्हणून बुरखा घालून गेली होती. मात्र परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर शाळा प्रशासनाने तिला प्रवेश देण्याआधी बुरखा काढण्यास सांगितले. माझ्या बहिणीने नाईट सूट घातला होता त्यामुळे ती घुटमळत होती मात्र तिच्यासोबत अन्य मुलींनी बुरखा काढला कारण त्यांना परीक्षेला बसू देणार नाही याची भीती वाटत होती. त्यानंतर मी लगेच नॅशनल स्टु़डंट्स युनिअन ऑफ इंडियाच्या (NSUI) समन्वयक हिना कनोजिया यांना संपर्क साधला ज्यानंतर त्या लगेच शाळेत आल्याची माहिती इमरान हंसारी याने दिली.
मला जशी माहिती मिळाली मी लगेच शाळेत आले आणि प्राध्यापकांशी संपर्क साधला. नियमांप्रमाणे बुरखा घालून परीक्षा देण्याची परवानगी असल्याचं मी त्यांना सांगितलं. बोर्डाच्या हेल्पलाईनला फोन करुन यासंबंधी चौकशीपण केली मात्र शाळा या नियमाबाबात अनभिज्ञ होती असं हिना कनोजिया यांनी सांगितल. शाळेने मात्र अजून यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.