मुंबई : राज्यात कोरोनाची संख्या वाढत असल्याने १३ जूनपासून शाळा सुरू होणार की नाही, याबाबत शंका उपस्थित होत असताना योग्य काळजी घेऊन नियोजनानुसारच शाळा सुरू करण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.राज्यात १३ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. मात्र, कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने त्याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. यावर, शाळा बंद करणे चुकीचे असल्याचे सांगत योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरू केल्या जातील, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. सध्या कोरोनाची वाढती रुग्णसंख्या निश्चितच चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आम्हाला निश्चितच काही निर्णय घ्यावे लागतील. सध्या शाळा सुरू करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.दोन वर्षांमध्ये मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता दुसरीत असलेली मुले तर पहिल्यांदाच शाळेत येतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे योग्य काळजी घेत शाळा सुरू करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
शाळांमध्ये मास्कबाबत टास्क फोर्सशी चर्चा शाळांमध्ये मास्क सक्ती करायची का, याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी टास्क फोर्ससोबत चर्चा केली जाईल. त्यानंतर आवश्यक मार्गदर्शक सूचना (एसओपी) जाहीर करू. सध्या सर्व मुलांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. सध्या कोणतेही निर्बंध अथवा सक्ती नाही. त्यामुळे शाळांच्या बाबतीत टास्क फोर्सशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
बूस्टरला आणखी गती देणार मुंबईसह राज्यात १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. कोविड पोर्टल नुसार मुंबईत आतापर्यंत ७.०१ लाख नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला. राज्याने आतापर्यंत १८ ते ५९ वयोगटातील ३,१२,१९२ बूस्टर डोस दिले होते. तिसऱ्या लाटेनंतर कोरोनाचा विषाणू गेला या मानसिकतेमुळे लसीकरणाची गती कमी झाली होती. शहरांमधील स्थलांतर ही वाढल्याने लसीकरणाकडे अनेकांनी पाठ फिरवली होती. मात्र आता संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जूनमध्ये बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना बाधा भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीस यांनी स्वत: समाजमाध्यमातून याबाबतची माहिती दिली. माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून वैद्यकीय सल्ल्यानुसार घरीच औषधोपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी आणि योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.