नागपूर : समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके देण्यात येतात. एकदा पुस्तके दिल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याचा वापर होत नाही. त्यामुळे यावर्षीपासून शासनाने पाठ्यपुस्तकाचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या विद्यार्थ्यांची चांगल्या अवस्थेतील पाठ्यपुस्तके पुढील सत्रातील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. त्यामुळे शासनाचा पुस्तकाच्या निर्मितीवर होणाऱ्या खर्चाला लगाम बसणार आहे.
यासंदर्भात शासनाने शिक्षण विभागाला निर्देश दिले असून, पाठ्यपुस्तकातून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पुस्तकाचा पुनर्वापर करण्यात येत असल्याचा दाखला दिला जात आहे. मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यावर राज्य शासन दरवर्षी २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करते. काही विद्यार्थी पाठ्यपुस्तके सुस्थितीत ठेवतात. नागपूर जिल्ह्यातील १५३५ शाळांना जून २०२० मध्ये ५ लाख ७१ हजार पाठ्यपुस्तकाचे वितरण केले होते. अद्यापही शाळा उघडल्या नाहीत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी तर पाठ्यपुस्तके उघडूनही बघितलेली नाहीत. अशा विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके पुढच्या सत्रात शाळा परत घेणार आहे. चांगल्या अवस्थेत असलेली पुस्तके नवीन सत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने परिपत्रक काढून जिल्हा परिषद व महापालिकेच्या शिक्षण विभागाला तसे निर्देश दिले आहेत. पालकांना व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून पाठ्यपुस्तके जमा करण्याचे आवाहन केले जाणार आहे.यादरम्यान पालक व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्वही पटवून सांगितले जाईल. मात्र, पुस्तके जमा करण्यासाठी सक्ती करू नये, असेही परिषदेने शिक्षण विभागाला सुचविले आहे.ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी तर पाठ्यपुस्तके उघडूनही बघितलेली नाहीत.