मुंबई : ग्रामीण भागासह राज्यातील शहरी भागातही पाण्याचे दुर्भीक्ष आहे त्यामुळे सर्वत्र पाणीकपातीचा निर्णय होत असून त्याचा फटका शाळांनाही बसत आहे. परिणामी पाणी बचतीसाठी शाळांचा आठवडा पाच दिवसांचा करण्याची मागणी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक धरणक्षेत्रात पाण्याचा साठा कमी असल्याने लोकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. खबरदारीची बाब म्हणून कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मुंबई महानगरपालिकेसह अनेक नगरपालिकांनीही पाणीपुरवठ्यात कपात सुरु केली आहे. त्याचा फटका शाळांनाही बसला आहे. राज्यात सुमारे १ लाखाहून अधिक शाळा असून त्यात सुमारे २ कोटींहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. शाळांना दैनंदिन पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर भासते. परिणामी राज्यात पाण्याची टंचाई असेपर्यंत शाळांचा आठवडा पाच दिवसांचा केला, तर पाण्याची व विजेची बचत होण्याचा पर्यायही बोरनारे यांनी सुचवला आहे.सध्या अनेक शाळांचे अभ्यासक्रम पूर्ण झाले असून परीक्षा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा केल्यास शाळांना कोणताही अडथळा येणार नसल्याचा दावा बोरनारे यांनी केला आहे. पाण्याची बचत करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन शाळांचा पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी शिक्षण विभागास आदेश देण्याची मागणी बोरनारे यांनीमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)
‘शाळांचा आठवडा पाच दिवसांचा करा’
By admin | Published: March 30, 2016 2:38 AM