मुंबई: अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसलेल्या इमारतींवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या महापालिकेच्या दिव्याखाली मात्र अंधार आहे़ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आपल्या शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा पालिकेने अद्याप बसविलेली नाही़ याची गंभीर दखल घेऊन शाळेतील आपत्कालिन यंत्रणेबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण समितीने आज प्रशासनाला दिले़ पालिकेच्या ११०० शाळांमध्ये साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चेन्नई येथील एका शाळेतील आगीच्या दुर्घटनेत निष्पाप विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले़ याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले होते. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने सर्व शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले होते़ मात्र, या घटनेच्या १२ वर्षांनंतरही अद्याप पालिकेने आपल्या शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा उभारलेली नाही़ त्याचबरोबर, आपत्कालिन आराखडाही तयार नाही़ शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे शिक्षण समितीचे याकडे लक्ष वेधले़ याबाबत स्पष्टीकरण देताना आपत्कालिन परिस्थितीमध्ये काय करावे? याचे धडे मुख्याध्यापकांना एका कार्यशाळेतून देण्यात आले आहेत़ शाळांचे क्षेत्रफळ बघून आपत्कालिन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येत आहे़ पुढील शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्यापूर्वी हा आराखडा तयार असेल, अशी हमी उपायुक्त रणजित ढाकणे यांनी शिक्षण समितीला दिली़ (प्रतिनिधी)शिक्षण खात्याचे पितळ उघडेपालिका शाळांमध्ये आपत्कालिन सुरक्षेसाठी माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे़, तसेच मॉकड्रीलही घेण्यात येत असल्याचा दावा उपशिक्षण अधिकारी जिवबा केळुस्कर यांनी केला़ मात्र, त्यांचा दावा खोडून काढत गेल्या पाच वर्षांमध्ये असे मॉकड्रील झालेली नाहीत, असे भाजपाच्या राजेश्री शिरवाडकर यांनी निदर्शनास आणले़ त्यावर दीड महिन्यांमध्ये मॉकड्रील पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले़
पालिका शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा नाही
By admin | Published: March 09, 2016 5:38 AM