धनाजी कांबळे -पुणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिन १४ एप्रिल जगभर ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांचा शिक्षणाचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील पहिला सायन्स आणि आयटी पार्क पुण्यात उभारण्याची तयारी सुरु झाली आहे. यासाठी एका तरुण अभ्यासकाने पुढाकार घेतला असून, याबाबत सरकारी पातळीवर निर्णय होण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. संशोधन, आयटी, माध्यम क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षांपासून असलेल्या सुजित ठमके यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. सामाजिक न्याय मंत्रालय, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पहिल्या पाच वर्षांसाठी १५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी लागणार असून, त्यानंतर दरवर्षी शंभर कोटींची तरतूद करावी लागणार आहे. या पार्कच्या माध्यमातून दरवर्षी हजारो रोजगार उपलब्ध होणार असून, प्रशिक्षित कौशल्यपूर्ण मनुष्यबळ देखील या पार्कमधून तयार होईल. आयटी बेस प्रशिक्षण, संशोधन यासबंधीचे मार्गदर्शन केले जाईल, असा नाविण्यपूर्ण प्रकल्प सरकारकडे मांडण्यात आला आहे. सुपर कॉम्प्यूटर, एचपीसी सेंटर, स्पेस टेक्नोलॉजी तसेच शासकीय, खासगी आणि व्यावसायिक विभागांचा देखील यात समावेश असणार आहे. नव्याने विकसित होणारे तंत्रज्ञान आणि त्याचा सर्वसामान्य शेतकरी माणसाच्या जीवनात त्याचा कसा उपयोग करता येईल, याचेही मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे. या पार्कसाठी लागणारी जमीन आणि इतर सामग्री याबाबतही अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी प्रस्तावात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख नेते शरद पवार यांना या प्रकल्पाबाबत माहिती दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाने पुढील दिशा आणि अपेक्षित कालावधी याची केंद्रीय स्तरावर प्रकल्प यशस्वी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही वेळ घेण्यात आल्याचे ठमके यांनी सांगितले. पार्कचे स्ट्रक्चर उभे राहिल्यानंतर आयआयटी, इस्रो, आयएमडी, भाभा अणुकेंद्र, टाटा संशोधन केंद्र यांचे तांत्रिक साह्य घेण्यात येणार आहे. तसेच सायन्स आणि टेक्नोलॉजी तज्ज्ञ, संशोधक यांचीही मदत घेण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सायन्स आणि आयटी पार्क असावे. ज्यातून रोजगार निर्मिती होईल आणि वाढत्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, अशी कल्पना गेल्या चार-पाच वर्षांपासून मनात होती. त्यासंबंधाने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा सुरु होती. त्यातून या प्रकल्पाचा एक आराखडा तयार केला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासोबत चर्चा करून पुढील दिशा ठरणार आहे. त्यासाठी त्यांची वेळ मागितली आहे. या प्रकल्पामुळे देशाच्या वैभवात निश्चितपणे भर पडेल.- सुजित ठमके, प्रकल्प निर्माते