पुणे : ‘गेल्या ६० वर्षांत देशाची झालेली प्रगती अभिमानास्पद आहे. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन राज्यकर्त्यांनी शिक्षण आणि विज्ञानवादी दृष्टीवर भर दिला. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अंगीकारामुळेच आज आपला देश प्रगतिपथावर आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीने विज्ञानाचा ध्यास घेतला पाहिजे, असे प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च येथील (आयसर) शास्त्रज्ञ डॉ. एल. एस. शशिधरा यांनी केले.राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘यंग एक्सप्लोरर’ या आंतरशालेय विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. प्रकल्प स्पर्धा, प्रश्नमंजूषा आणि निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव त्यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी इस्रोचे माजी संचालक डॉ. प्रमोद काळे, लीप अँड स्केल संस्थेचे प्रशांत जोशी, भारतीय विद्याभवन संस्थेचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे, विज्ञानशोधिकेचे मानद संचालक अनंत भिडे, उपसंचालिका नेहा निरगुडकर, भारती बक्षी रश्मी बहुलकर व स्नेहलता शेलार आदी उपस्थित होते.स्मार्ट सिटी, स्टेप क्लायंबिग बास्केट, मल्टिपर्पज सेफ्टी फॅन, मोड्यूलोपेंडुलम असे विविध प्रकारचे प्रकल्प इथे मांडण्यात आले होते. या प्रकल्प प्रदर्शनात ३० शाळांतून जवळपास ७० प्रकल्प मांडण्यात आले होते. अनंत भिडे यांनी प्रास्ताविक केले. नेहा निरगुडकर व रश्मी बहुलकर यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहलता शेलार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)>‘शिक्षण हाच शिक्षण हाच सक्षम बनण्याचा मार्ग आहे, हे ओळखून भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी शिक्षण व संशोधन संस्था उभारण्यावर भर दिला. विज्ञानाची प्रगती होत गेली तशी तंत्रज्ञानातही क्रांती झाली. आज अनेक गोष्टी आपण निर्यात करू लागलो आहोत. अनेक देश संशोधनासाठी आपल्याकडे हात पुढे करताहेत. मात्र, नोबेल पारितोषिकापासून आपण अजूनही दूर आहोत. देशाच्या विकासात विज्ञान-तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा ध्यास ठेवून समाजाचे प्रश्न सोडवणारे संशोधन करावे, असे ते म्हणाले.
नव्या पिढीने विज्ञानाचा ध्यास घ्यावा
By admin | Published: March 02, 2017 1:05 AM