पुणे : भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्य आहे. या पाककलांमध्ये शरीरविज्ञानाचा विचार खोलवर रुजलेला आहे. त्यामुळेच पचनसंस्थेत असलेल्या मायक्रोन्सपर्यंत पदार्थ पोहोचल्यानंतर त्या पदार्थाच्या चवीला उत्स्फूर्त दाद मिळते. पाककलेमागे वैज्ञानिक सिद्धांत असल्याचे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.नंदिनी पब्लिशिंग हाऊसतर्फे अनुराधा तांबोळकरलिखित ‘मेजवानी व्हेजवानी’ (भाग एक आणि दोन) या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, मास्टर शेफ नीलेश लिमये, मास्टर शेफ राहुल कुळकर्णी, लेखिका अनुराधा तांबोळकर, नंदिनी पब्लिशिंग हाऊसच्या संचालिका नंदिनी तांबोळी, डॉ. एन. जी. तांबोळकर, डॉ. अजित तांबोळकर आदी उपस्थित होते.डॉ. भटकर म्हणाले, ‘‘अध्यात्म आणि विज्ञान हा भारतीय पाककलेचा पाया आहे. ‘मेजवानी व्हेजवानी’ या पुस्तकाच्या माध्यमातून पाककलेचा विश्वकोशच तयार झाला असून हा एक प्रकारचा जागतिक विक्रमच आहे. पाककला हा विषय केवळ महिलांपुरताच मर्यादित न ठेवता शाळकरी वयापासून मुलाुमलींना विविध पदार्थ शिकवून त्यांना समृद्ध केले पाहिजे.’’या वेळी नंदिनी तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केले. लेखिका अनुराधा तांबोळकर यांनी पुस्तकलेखनामागील भूमिका विशद केली. प्रारंभी डॉ. संपदा तांबोळकर, कांचन तांबोळकर, अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि रजनी वेलणकर यांच्या हस्ते चुलीची आणि अन्नपूर्णेची पूजा करण्यात आली. या वेळी प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांनी अन्नपूर्णा स्तोत्र सादर केले. वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले. तेजा पारुंडेकर यांनी आभार मानले.भारतीय खाद्य संस्कृती खूप समृद्ध असून ‘मेजवानी व्हेजवानी’ या पुस्तकामुळे या समृद्धीची व्याप्ती वाढली आहे. मागील दोन पिढ्यांचा हा वारसा आता पुस्तकाच्या रूपाने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचतोय, ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.- प्रदीप वेलणकर
पाककृतीमागे वैज्ञानिक सिद्धांत- डॉ. विजय भटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 3:44 AM