नागपूर : यज्ञातील आहुतीतून प्रदूषण नव्हे, तर ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, या वेदांतील दाव्याचे वैज्ञानिक तथ्य पडताळून पाहण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो आणि नीरीचे शास्त्रज्ञ नागपुरात दाखल झाले आहेत. रेशीमबाग येथे धर्मसंस्कृती महाकुंभात तीन दिवसीय जपयज्ञ पूर्णाहुती सोहळ्याला शुक्रवारी सुरुवात झाली असून, त्यामुळे वातावरणात होणारे बदल शास्त्रज्ञ अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने टिपणार आहेत.धर्मकुंभात शुक्रवारपासून हनुमान चालिसा अनुष्ठान १११ कोटी, श्रीशिवमहिम्न अनुष्ठान ११ कोटी व शिवपंचाक्षरी मंत्रानुष्ठान ३६ कोटी, असा जपयज्ञ पूर्णाहुती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस यज्ञात आहुती देण्यात येणार आहे. यातून निघणारा धूर वातावरणासाठी पोषक असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी वैदिक विज्ञान संशोधन संस्थेने इस्रो आणि नीरी या संस्थांची मदत घेतली आहे. यासाठी रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटरतर्फे या परिसरातील वातावरणाचे नमुने उपग्रहांच्या माध्यमातून १९ डिसेंबरपासून गोळा करण्यात येत आहेत, तर नीरीच्या वायुप्रदूषण विभागातर्फे गेल्या दोन दिवसांपासून नमुने नोंदविणे सुरू झाले आहे.
वैज्ञानिक घेणार यज्ञातील ऊर्जेचा शोध!
By admin | Published: December 24, 2016 5:03 AM