ऑनलाइन लोकमतखोडद, दि. 28 - विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रश्नांकडे पाहताना विविध दृष्टिकोन ठेवून त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. असे झाले तर ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात शास्त्रज्ञ उदयास येऊ शकतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ व मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन केंद्र संस्थेचे संचालक प्रा. संदीप त्रिवेदी यांनी व्यक्त केले.जगातील सर्वाधिक मोठ्या व महाकाय असणाऱ्या खोडद (ता. जुन्नर) येथील जीएमआरटी प्रकल्पात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित १७ व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन त्रिवेदी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही आता विज्ञानाची गोडी व आवड निर्माण होऊ लागली आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. निश्चितच यात खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पाचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांनीही विज्ञानाकडे किचकट, अवघड व रटाळ म्हणून न पाहता अगदी सहजपणे पाहून विज्ञानातील आपली स्वत:ची प्रयोगशीलता वाढवावी.
( रामप्रहरी ज्योतिषाऐवजी विज्ञान दाखवा - डॉ. जयंत नारळीकर )
( विज्ञान संशोधनात स्त्रिया मागे का? )
प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी एनसीआरएचे केंद्र संचालक प्रो. एस. के. घोष, जीएमआरटी प्रकल्पाचे अधिष्ठाता प्रो. यशवंत गुप्ता, विज्ञान दिन समितीचे अध्यक्ष प्रो. ईश्वर चंद्रा, जीएमआरटी प्रकल्पाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी, जीएमआरटीचे प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे, खोडदचे सरपंच विजय गायकवाड आदी उपस्थित होते.प्रदर्शनाचा पहिलाच दिवस असूनही देखील सुमारे १० हजार विज्ञानप्रेमींनी या विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली.
( अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा )
विज्ञान प्रदर्शनात होमी भाभा केंद्र (मुंबई), बलून फॅसिलिटी (हैदराबाद), कांदा व लसूण संशोधन केंद्र (राजगुरुनगर), आघारकर अनुसंधान संस्था (पुणे), राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था - नारी (पुणे), विज्ञान वाहिनी (पुणे), भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था (पुणे), भूशास्त्र विभाग (पुणे विद्यापीठ), भारत मौसम विभाग, कृषी मौसम विभाग प्रभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय (शिवाजीनगर, पुणे), मॉझिल्ला इंडिया, सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनीअर्स इंडिया, ज्योतिर्विद्या परिसंस्था (पुणे), खगोल विश्व (पुणे), एफटर्स डिजिटल तारामंडल (अहमदनगर), फॉस कम्युनिटी इंडिया, विज्ञान आश्रम (पाबळ), नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन (पुणे), सी-स्काय दुर्बीण (मुंबई), रविवार विज्ञान शाळा (पुणे), आकाश मित्र मंडळ (मुंबई) या संस्थांनी विविध प्रयोग सादर केले आहेत.