नागपूर : पुण्यातील बालभारतीच्या दैनंदिन व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी पाच वर्षांपूर्वी १० कोटी खर्च करून सॅप यंत्रणा खरेदी करण्यात आली होती. परंतु सदर यंत्रणा वापराविना पडून असल्याबाबतची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.बालभारतीने सॅप यंत्रणा खरेदी केली होती. परंतु कर्मचाऱ्यांनी या यंत्रणेला विरोध केला होता. त्यामुळे ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात अडचणी आल्या. त्यामुळे सॅप ऐवजी पोर्टलच्या माध्यमातून कारभार सुरू केला आहे. आॅनलाईन कामकाज होत आहे. पुस्तकांची मागणी, नोंदणी व रक्कम भरण्याची प्रक्रि या याच यंत्रणेद्वारे होत आहे. सर्वशिक्षा अभियानात केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होतो. बालभारतीचा शैक्षणिक गुणवत्तेवर भर देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती तावडे यांनी दिली. अॅड. जयदेव गायकवाड यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. हेमंत टकले यांनी सॅप यंत्रणेत कोणत्या उणिवा राहिल्या असा प्रश्न केला. जयंत पाटील यांनी किती मुद्रणालयाला काम देण्यात आले, किती पुस्तकांची छपाई केली जाते असा उपप्रश्न उपस्थित केला होता. १० कोटीची सॅप यंत्रणा खरेदी करण्यात आली होती. परंतु ती निर्धारित कालावधीत सुरू न झाल्याने परवान्याची मुदत संपल्याची माहिती तावडे यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली. (प्रतिनिधी)
बालभारतीच्या सॅप प्रकरणाची चौेकशी
By admin | Published: December 22, 2015 2:05 AM