मुंबई : आझमगढ हत्याकांडप्रकरणी सात वर्षे पसार असलेल्या ‘कॉमेडी नाइट्स’च्या स्क्रिप्ट रायटरला उत्तर प्रदेश पोलिसांनी वर्सोवा येथून अटक केली. राम अभिषेक सिंह असे त्याचे नाव आहे. नाव बदलून तो वर्सोवा परिसरात राहत होता. सिंहने ग्रेट इंडियन फॅमिली ड्रामामध्ये भूमिकादेखील केल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या तो के-९ प्रोडक्शनसाठी काम करत होता. हे हत्याकांड आझमगढ येथील मेहजानपूर गावात घडले होते. यातील संशयित राम सिंह याचे आजोबा विभूती नारायण सिंह हे गावातील शाळेचे मॅनेजर आहेत. तर याच गावचा प्रधान असलेल्या भुरे सिंह यांच्याशी त्यांचा जमिनीवरून वाद होता. या वादातून राम सिंह याच्या कुटुंबीयांनी शस्त्रांसह त्यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात भुरे सिंह वाचले. रामनरेश शर्मा आणि रामेश्वर मारले गेले होते. तेव्हापासून राम सिंह हा केरा सिंह, बलजीर सिंह आणि रोहित सिंह या नावांनी वावरत होता. त्याच्या शोधासाठी ३० हजारांचे बक्षीस लावले होते. तो ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’साठी काम करत असल्याची आणि नाव बदलून वर्सोवा येथे राहत असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाली. त्यानुसार सिंहला वर्सोवा येथून अटक करण्यात आली; त्याला अंधेरी न्यायालयात हजर करत त्याची ट्रान्झिस्ट रिमांड घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
‘कॉमेडी नाइट्स’च्या स्क्रिप्ट रायटरला अटक
By admin | Published: August 06, 2016 5:09 AM