ठाणे : जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत एखाद्या तलावात, नदीत अथवा पुरात खोलवर बुडालेल्यांना बाहेर काढण्याचे काम ठाण्यातील स्कुबा डायव्हर विजय पटवर्धन आणि त्यांचा मुलगा कमलेश हे पितापुत्र करीत आहेत. यासाठी ते स्वत:ची पदरमोड करून मागील ३३ वर्षे मोफत सेवा देत आहेत. परंतु, या कामाचे श्रेय महापालिका आणि पोलीस प्रशासनच घेत असल्याची खंत या दोघांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे १९९३ मध्ये नागलाबंदर खाडीतून २६८० किलो आरडीएक्स बाहेर काढल्यानंतर महापालिकेने त्याच वर्षी त्यांचा सत्कार करण्याचा ठराव मंजूर केला होता. परंतु, आज त्याला २१ वर्षे उलटूनही त्यांचे कौतुक तर सोडाच, साधी विचारणाही त्यांना केलेली नाही.रविवारी सायंकाळी उपवन तलावात बुडालेल्या दोघांना काढण्यात अग्निशमन आणि पोलीस यंत्रणेला अपयश आल्यानंतर विजय आणि कमलेश यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी केवळ १५ मिनिटांच्या आत सुमारे ३५ फूट खोल पाण्यात जाऊन हे मृतदेह बाहेर काढले. मागील ३३ वर्षे विजय हे अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांत मोफत कार्य करीत आहेत. परंतु, त्यांच्या कार्याचा एक छदामही अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थेने अथवा पोलीस यंत्रणेने दिला नाही. रात्री-अपरात्री त्यांचे हे कार्य सुरू आहे. २ एप्रिल १९९३ रोजी नागलाबंदर येथील खाडीत टाकलेले २६८० किलो आरडीएक्स आणि जिलेटीन त्यांनी बाहेर काढले. त्यानंतर, पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यांच्या सत्काराचा ठराव करण्यात आला. परंतु, आता त्याला २१ वर्षे उलटून गेल्यानंतरही या ठरावाची अंमलबजावणी पालिकेला करता आलेली नाही. तसेच त्यांच्या ठाणे स्कुबा डायव्हिंग क्लबचे सदस्य १९९१ पासून गणपती विसर्जनाच्या दिवशी जीवनरक्षक पथक म्हणून काम पाहत असून स्वत:चे जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवित आहेत. जानेवारी १९९४ मध्ये कळवा येथे पाण्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी संबंधित यंत्रणेने दोन दिवस प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही. त्यानंतर, हेच काम पटवर्धन यांनी केले. भिवंडीत खाडीत पडलेला मालवाहू ट्रक त्यांनी शोधून काढला.
स्कुबा डायव्हर पितापुत्रांची महापालिकेस कदर नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2015 1:14 AM