संदीप बोडवे - मालवण --तारकर्ली येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने साकारलेल्या स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या स्विमिंग टँकला लागलेली गळती दूर करण्यास यश आले असून दिवाळीच्या कालावधीत स्कुबा डायव्हिंग सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचा विश्वास एमटीडीसीचे साहसी जलक्रिडा व्यवस्थापक सुबोध किनळेकर यांनी व्यक्त केला.जागतिक दर्जाचे प्रशिक्षित स्कुबा डायव्हर्स निर्माण करून सिंधुदुर्गच्या समुद्रातील विश्व जगासमोर आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथे स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. अमेरिकेतील पॅडी या आंतरराष्ट्रीय संस्थेशी संलग्न राहून स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जगातील ७० टक्के स्कुबा डायव्हिंग संदर्भातील कोर्स पॅडी या संस्थेमार्फत होतात. यामध्ये येथून प्रशिक्षण घेतलेल्या स्कुबा डायव्हर्सना जागतिक मान्यता मिळणार आहे. सामान्य डायव्हर्सपासून प्रशिक्षण तज्ज्ञांपर्यंतचे अभ्यासक्रम तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये शिकविले जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना येथे येवून स्कुबा ड्रायव्हींगचा आनंद लुटता येईल. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची संख्याही वाढण्यास मदत होणार आहे. जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम शिकविणार स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या अभ्यासक्रमांबाबत माहिती देताना सुबोध किनळेकर म्हणाले, तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटर जागतिक दर्जाचे बनविण्यामध्ये एमटीडीसीने कोणतीही कसर ठेवली नाही. सेंटरच्या वॉटर टँकला लागलेली गळती तज्ज्ञांद्वारे वॉटर प्रुफींग करून दूर करण्यात आलेली आहे. १० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये १ तासापासून ते २० दिवसांपर्यंतचे वेगवेगळे कोर्स असणार आहेत. प्रामुख्याने डिस्कव्हर स्कुबा, बबल मेकर, ओपन वॉटर, अॅडव्हान्स ओपन वॉटर, डाईव्ह मास्टर, इन्स्ट्रक्टर असे जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या स्कुबा डायव्हर्सना जगात कुठेही नोकरीच्या संधी मिळू शकतात.
स्कुबा डायव्हींग सेंटर सुरू होणार---लोकमत विशेष
By admin | Published: October 20, 2014 9:05 PM