कल्याण : ज्येष्ठ शिल्पकार सदाशिव दत्तात्रय साठे यांचे आज वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सूना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे पुतणे आणि नवोदित शिल्पकार सिद्धार्थ साठे यांनी दिली आहे.
साठे हे कल्याण पश्चिमेतील साठे वाड्यात राहत होते. तीन दिवसांपासून त्याची प्रकृती ठिक नव्हती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच कला जगतात शोककळा पसरली आहे. साठे हे शिल्पकलेच्या जगतात भाऊ या नावाने परिचित होते. साठे यांचा जन्म 17 मे 1926 साली पेण येथील वावोशी गावात झाला. त्यांनी शिल्प कलेचे शिक्षण जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून घेतले. 1947 साली दे जेजे कला महाविद्यालयातून कलेची पदवी घेऊन उत्तीर्ण झाले होते.
दिल्ली येथील महात्मा गांधी यांचे शिल्प साठे यांनी साकारले आहे. सार्वजनिक ठिकाणी गांधीचे पहिले शिल्प अशी त्यांची ख्याती आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साठे यांनी साकारला होता. पुरंदर येथील मुरारबापू यांचा पुतळाही त्यांनीच साकारला होता. इंदिरा गांधी, रामनाथ गोयंका आदींचे शिल्प त्यांनी साकारले. साठे यांच्या शिल्प कलेची दखल घेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरु यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांची शिल्पे हे ऑस्ट्रेलिया, नार्वे, जपान या ठिकाणी बसविण्यात आलेली आहे.
गेली पाच दशके त्यांनी शिल्पकलेत भरीव कार्य केले. 2019 साली त्यांनी साकारलेले दांडी यात्रेचे शिल्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. दांडी यात्र ही भाऊ यांनी साकारलेले शेवटचे शिल्प ठरले. साठे यांच्या शिल्प कलेची दखल घेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरु यांनी त्यांची भेट घेतली होती. भाऊ हे कल्याणचे असल्याने त्यांना कल्याण भूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांना गोदा पुरस्कारही देण्यात आला होता. लोकमत महाराष्ट्रीन ॲाफ द इयर पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.
आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी या दोन्ही संस्थांकडून लाईफ टाईम अचिव्हमेंटचा पुरस्कार देऊन भाऊंच्या शिल्पकलेचा गौरव केला होता. शिल्प कलेची एकच पठडी न ठेवता नवनवीन प्रयोग करण्यात त्यांचा हातखंडा होता. शिल्पकलेत त्यांनी खूप सारे प्रयोग केले. त्यांचा पुतण्या सिद्धार्थ याने त्यांच्याकडून शिल्पकलेचे धडे घेतले. तसेस जे. जे. कला महाविद्यालयातून सिद्धार्थनेही शिल्प कलेचे शिक्षण घेतले.
शिल्पकलेच्या दोन पिढयातील अंतर टिपताना सिद्धार्थ यांनी सांगितले की, भाऊ हे माङो काका होते. त्यांच्या जवळ राहून शिल्पकला मला शिकता आली. त्यांच्या कलेचा वारसा पुढे चालवत राहणार असल्याचे सिद्धार्थ याने सांगितले. भाऊ यांची एक मुलगी अल्पना लेले या गोव्यात वास्तव्याला आहे. त्या देखील चित्रकार आहेत. भाऊंनी शिल्पांच्या जन्मकथेवर आकार हे पुस्तकाचे लेखन केले होते.
त्याचबरोबर डोंबिवली औद्योगिक वसाहतीत त्यांनी शिल्पालय साकारले होते. त्याठिकाणी त्यांची अनेक शिल्पे ठेवण्यात आली आहे. तो त्यांचा शिल्प कलेचा स्टुडिओ आहे. साठे यांच्या निधनाने जागतिक किर्तीचा शिल्पकार हरपला आहे. त्यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही अशी प्रतिक्रिया कला जगतातील मान्यवरांकडून व्यक्त केली जात आहे.