भार्इंदर : ऐन मासेमारीच्या हंगामात ओएनजीसी (आॅइल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन) या तेल कंपनीद्वारे समुद्रात तेल सर्वेक्षण होत असल्याने त्याविरोधात पश्चिम किनारपट्टीवरील मुंबईच्या कुलाबा ते पालघरसह सातपाटीपर्यंतच्या मच्छीमारांनी शुक्रवारी बोटींवर काळे झेंडे लावून भरसमुद्रात निदर्शने केली. ओएनजीसी तेल कंपनीमार्फत पश्चिम किनारपट्टीवरील वसई ते अर्नाळा समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे ५० नॉटीकल मैल अंतरावर १५ जानेवारीपासून तेलसाठ्याचे सर्वेक्षण सुरू करण्याचे निश्चित केले होते. सुरुवातीला हे सर्वेक्षण ६ ते २१ जानेवारीदरम्यान करण्याचे ठरविले होते. परंतु, तांत्रिक कारणास्तव ते १५ जानेवारी रोजी सुरू करण्याचे ठरविल्यानंतर मच्छीमारांचा त्याला होणारा विरोध लक्षात घेऊन त्याला अद्याप सुरुवात झालेली नाही. हे सर्वेक्षण साधारणत: ८ ते १० चौरस नॉटीकल मैल क्षेत्रातच होत असताना सर्वेक्षणादरम्यान मच्छीमारांना मासेमारीसह समुद्रात ये-जा करण्यास बंदी घालतली होती. ऐन मासेमारी हंगामात मासेमारीवर तेल सर्वेक्षणामुळे गंडांतर येणार असल्याने मच्छीमारांनी याला विरोध दर्शविला आहे. ते १५ मेनंतर मासेमारी बंदीच्या कालावधीत करण्याची मागणी मच्छीमारांनी केली असून तसे पत्रच शासनासह ओएनजीसीला दिले आहे़ परंतु, त्यावर निर्णय न झाल्याने कुलाबा ते सातपाटीदरम्यान हजारो मच्छीमारांनी शुक्रवारी बोटींना काळे झेंडे लावून ३० ते ३५ नॉटीकल मैल खोल समुद्रात जाऊन निषेध व्यक्त केला. यासाठी १९-२५ व ७२-१२ (जीपीएस पोझिशन सिस्टीम) पोझिशनच्या ठिकाणी मच्छीमार बोटी एकत्र आल्या. त्याचा आढावा घेण्यास सागरी पोलिसांनीही समुद्रात धाव घेतली होती. दरम्यान, सर्वेक्षण सुरू न झाल्याने मासेमारी सुरू असल्याचे पाली-उत्तन मच्छीमार सहकारी संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तेल सर्वेक्षणाविरोधात समुद्रात निदर्शने
By admin | Published: January 17, 2015 5:48 AM