ऑनलाइन लोकमतसांगली, दि. २५ : अबकारी कराची सुमारे सव्वादहा कोटी रुपयांची थकबाकी वसूल न झाल्याने केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची दोन गोदामे सील केली आहेत. नोव्हेंबर २0१५ पासूनच्या अबकारी कराच्या थकबाकीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही अबकारी कराच्या थकबाकीप्रकरणी गोदाम सील करण्याची कारवाई केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने केली होती. सेसमध्ये वाढ झाल्याने थकबाकीची रक्कम आता मोठी दिसत आहे. डिसेंबर २0१५ मधील साखर विक्रीवरील कराची ही रक्कम थकीत असल्याबद्दल केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने नोटीस बजावली होती. त्यानंतरही कराचा भरणा झाला नसल्याने कारखान्याच्या मागील बाजूस असलेली दोन मोठी गोदामे सील करण्यात आली आहेत. त्याठिकाणची साखरही जप्त करण्यात आली आहे. साखरेचा साठा, थकबाकी याबाबत कारखाना प्रशासन, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. यापूर्वी २0१४ मध्ये अबकारी करापोटी अशीच कारवाई झाली होती. वसंतदादा कारखान्याने एप्रिल व जून २०१४ मध्ये विक्री केलेल्या साखरेवरील १ कोटी ५० लाखांचा अबकारी कर भरला नव्हता. दंड व करासाठी उत्पादन शुल्क विभागाने साखर कारखान्याच्या १५ नंबरच्या गोदामातील १३ हजार ३९० पोती साखर जप्त करून गोदामाला सील ठोकले होते. आता पुन्हा एकदा गोदामे सील केल्याने कारखान्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. गोदामे सील केल्याप्रश्नी वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही
वसंतदादा कारखान्याची गोदामे सील; अबकारी कराची थकबाकी
By admin | Published: July 25, 2016 7:57 PM