मुंबई : अखंड महाराष्ट्राचा ठराव आणि स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी विधानसभा आणि विधान परिषदेत प्रचंड गोंधळ सुरू होता. सभागृहात कामकाज सुरू असतानाच विरोधकांनी प्रतिविधानसभा भरवून भाषणे दिली. शिवसेनेने अचानक यू-टर्न घेत भाजपाशी हातमिळवणी केली, तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनीच स्वतंत्र विदर्भाचा अशासकीय ठराव याच अधिवेशनात दिला होता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. या गोंधळात सलग दुसऱ्या दिवशी कामकाजावर पाणी पडले.मी अखंड महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री असून विदर्भाचा कोणताही प्रस्ताव सरकारपुढे नाही, असे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा दिले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर शिवसेनेने आपली भूमिका बदलत, अखंड महाराष्ट्राचा ठराव मांडण्याची मागणी मागे घेतली. शिवसेनेने यू-टर्न घेतल्याची टीका चॅनेल्सवर सुरू होताच शिवसेनेचे सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि एकनाथ शिंदे या मंत्र्यांनी रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर दोन बैठका घेतल्या. मातोश्रीवरून उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलले. पण तोवर बरेच पाणी वाहून गेले होते. मुख्यमंत्र्यांनी अखंड महाराष्ट्राची भूमिका मांडल्याने आमचे समाधान झाले, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अखंड महाराष्ट्रासाठी विरोधकांचा ठराव१०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून झालेला संयुक्त महाराष्ट्र हा अखंडच राहिला पाहिजे, असा ठराव काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने आज सायंकाळी सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना देण्यात आला. त्याबाबत अध्यक्ष बुधवारी काय निर्णय घेतात याविषयी उत्सुकता आहे. (विशेष प्रतिनिधी)>मी अखंड महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री - फडणवीसजयंत पाटील साहेब! तुमच्या मेहरबानीने आम्ही सत्तेत आलेलो नाही. राज्यातील जनतेने आम्हाला पाठविले आहे. आमचे राजीनामे मागण्याचा अधिकार जनतेला आहे, तुम्हाला नाही, असे विरोधी पक्षांना सुनावत ‘मी अखंड महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री आहे’, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, एखाद्या राज्याची निर्मिती हा केंद्र सरकारच्या अधिकारातील विषय आहे. राज्य सरकारमध्ये वा मंत्रिमंडळासमोरदेखील स्वतंत्र विदर्भाचा कुठलाही ठराव आलेला नाही. मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. घटनेप्रति प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.>पटेल को पुछ के आओ : वडेट्टीवारांच्या ठरावावरून काँग्रेसची कोंडी केल्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना टार्गेट केले. इथे तुम्ही संयुक्त महाराष्ट्राबद्दल एवढे बोलताय. तुमचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बाहेर विदर्भ राज्याचे समर्थन केले आहे. ‘जाओ पहले प्रफुल्ल पटेल को पुछ के आओ’, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले. >वाघाचे काय झाले? शेळी झाली, शेळी झालीअखंड महाराष्ट्राच्या ठरावावरून शिवसेनेने यू-टर्न घेतल्याचा आरोप करीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवसेनेची खिल्ली उडविणाऱ्या घोषणा दिल्या. ‘वाघाचे काय झाले, शेळी झाली शेळी झाली’, ‘सिंहाने (भाजपा) काय खाल्ले, वाघ (शिवसेना) खाल्ला वाघ खाल्ला’, ‘या वाघाने काय खाल्ले गवत खाल्ले गवत खाल्ले!’ अशा या घोषणा होत्या. >आमदार बसले रायटर्सच्या खुर्चीतविरोधी पक्षाचे आमदार वेलमध्ये बसलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरी येथील आमदार नरहरी झिरवळ हे विधानसभा कामकाजाची नोंद घेणाऱ्या रायटर्सच्या खुर्चीत जाऊन बसले. झिरवळ यांनी सभागृहाचा अपमान केल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आणि त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. तेव्हा कुठे झिरवळ खुर्चीतून उठले.>>उद्धव ठाकरेंचा चव्हाणांना फोन! : मुख्यमंत्र्यांनी सभागृहात भूमिका मांडल्यानंतर आता काय करायचे यासाठी सल्ला घेण्याकरता सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते हे शिवसेनेचे मंत्री मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. ते विधानभवनाकडे परत येत असतानाच उद्धव ठाकरे मोबाइलवरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलले. त्यांच्यातील चर्चेनंतरच शिवसेनेचे मंत्री आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. >महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत आम्हाला कोणी शिकवू नये. उद्या सत्ता की अखंड महाराष्ट्र, असा प्रसंग आला तर आम्ही सत्ता सोडून देऊ.- एकनाथ शिंदे, शिवसेना नेते>शिवसेनेची मांडवली अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपाशी मांडवली केली असून त्या बदल्यात काय मिळाले? ते शिवसेनेने जाहीर करावे. - राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते
अखंड गोंधळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2016 5:48 AM