तुळजापूर : भाविकाने केलेल्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार काशीनाथ पाटील यांनी रविवारी येथील श्री तुळजाभवानी मंदिरात बोगस पुजाऱ्यांची शोध मोहीम राबविल्यामुळे पुजारीवर्गात खळबळ उडाली आहे. रविवार हा सुटीचा दिवस त्यातच या दिवशी दुर्गाष्टमी असल्यामुळे तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी तुळजापुरात हजेरी लावली होती. यामुळे घाटशीळ वाहनतळ, कमान वेस, उस्मानाबाद रोड या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. शिवाय मंदिरातील दर्शन मंडपही भाविकांच्या गर्दीने खचाखच भरले होते. व्हीआयपींची संख्याही तशीच होती. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तहसीलदार काशीनाथ पाटील यांनी दुपारी मंदिरात येवून दर्शन व्यवस्थेची पाहणी केली. याच वेळी एका भाविकाने मंदिरात काही बोगस पुजारी वावरत असून, ते भाविकांना थेट दर्शनासाठी सोडत असल्याची तक्रार पाटील यांच्याकडे केली. यावरून पाटील यांनी तातडीने शोधमोहीम राबविली. मात्र, यावेळी तसे निदर्शनास आले नाही, असे पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)
बोगस पुजाऱ्यांची शोध मोहीम
By admin | Published: June 13, 2016 11:32 PM