ऑनलाइन लोकमत/ महेश चेमटे
मुंबई, दि. 30 - पुरातन वास्तूंच्या शोधाचा इतिहासतज्ज्ञांचा ध्यास असतो. त्यातूनच हडप्पा-मोहंजोदडो या नगरींचा शोध लागला. लोकहितासाठी प्रसंगी कुतूहलापोटी विविध अद्भूत गोष्टींचा शोध अवलियांकडून लावला जातो. अशाच एका अवलियाने जालन्यातील सहा दशकांपूर्वी सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था मानले गेलेल्या रुग्णालयाचा शोध लावला. या अवलियाचे नाव डॉ. नीरज देव. मनोविकारतज्ज्ञ असलेल्या डॉ. देव यांनी केलेली ही ‘पागलखाने की खोज’ खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी...
मानसिक आरोग्याबाबतच्या गरजा ओळखून निजामाने १८९४ साली जालना येथे मनोरुग्णालय सुरु केले. त्यावेळी ते ‘दारुल मजानिन’ या नावाने नावारुपास आले. स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे साधारण १९४९ मध्ये दारुल मजानिन हे नाव बदलून ‘सरकारी मेंटल हॉस्पिटल, जालना’ असे नामकरण करण्यात आले. हे रुग्णालय उभारण्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात ठाणे, पुणे रत्नागिरी, नागपूर अशा चार ठिकाणीच अशी रुग्णालय कार्यरत होती.
भौगोलिकदृष्ट्या विचार करता पुणे-कोकण पट्ट्यात एकूण-३ आणि विदर्भात- १ रुग्णालय होते. मध्य महाराष्ट्रात मानसिक रुग्णांच्या सोयीसाठी जालना येथे या रुग्णालयाचा पाया रचण्यात आला होता. परिणामी येथे अत्याधुनिक सुविधेसह तब्बल ३५० ते ४०० खाटांचे रुग्णालय त्याकाळात सुरु करण्यात आले होते.
जालना देवळगाव राजा रोडवरील १७ एकरच्या विस्तीर्ण जागेत सरकारी रुग्णालय सुरु झाले. पुरुष व महिला रुग्णांसाठी दोन स्वतंत्र इमारती, सायकोथेरेपिस्ट, रुग्णालयाला भेट देणाऱ्या डॉक्टरांच्या निवासासाठी विशेष खोली, रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी निवासासाठी स्वतंत्र व्यवस्था, बैठक रुम अशा विविध सोयीसुविधा रुग्णालयात देण्यात आलेल्या होत्या. त्यातूनच या रुग्णालयाची भव्यता लक्षात येऊ शकेल. जालना येथील रुग्णालयाचे पुरुष विभागाचे अधिष्ठाता म्हणून डॉ.आर. नटराजन आणि महिला विभागात डॉ. नेसळकर या कार्यरत होत्या. डॉ.नटराजन आणि नेरुळकर यांच्या नजरेखाली सर्वकाही सुरळित चालू होते. डॉ.नटराजन हे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे जावई आहेत.
मानसिक रोगी या रुग्णालयात योग्य उपचार घेत होते. १९४८ मध्ये हैद्रराबाद मुक्ति संग्रामात देश धगधगत होता. त्याची झळ राज्याला ही बसली. संस्थान खालसा झाल्यानंतर निजाम हैद्राबादमध्ये गेला. मात्र येथून जाताना निजामाने जालना येथील सुस्थितीत आणि सुरळीत सुरु असलेले ‘दारुल मजानिन’ अर्थात ‘सरकारी मनोरुग्णालय’ देखील सोबत नेण्याची खूणगाठ बांधली. निजामाने रुग्णालयातील अत्याधुनिक उपकरणे, सोयीसुविधा उभारलेली विविध साधन सामुग्री, खाटा आणि रुग्णालयांतील सर्व रुग्णांना देखील आपल्यासोबत हैद्राबादला नेले. त्यानंतर या रुग्णालयाच्या सगळ््याच खुणा पुसल्या गेल्या. डॉ. देव यांना जेव्हा या रुग्णालयाची थोडीबहुत माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी रुग्णालयाबाबतचे उत्खनन सुरु केले. काही सरकारी कागदपत्रे डॉ. देव यांच्या हाती लागली, तर बरीचशी कागदपत्रे त्यांनी माहितीचा अधिकार वापरुन प्राप्त केली. त्यानंतर ज्या ठिकाणी हे रुग्णालय अस्तित्त्वात होते, ते ठिकाण त्यांनी गाठले. या ठिकाणी दोन शाळा आणि काही भागांत अतिक्रमण झाल्याचे त्यांना दिसून आले. पण त्याबरोबरच बरीच रंजक माहितीही त्यांच्या हाती लागली. निजामाला मनोरुग्णालयाचे महत्त्व समजले. तथापि, आपल्याला अजूनही एवढ्या वर्षांनंतर याचे महत्त्व न समजल्याची खंत डॉ. देव बोलून दाखवतात.
मुळात सुयोग्य स्थितीतील रुग्णालय हैद्रराबादला नेण्याची निजामाला गरज काय भासली? रुग्णालय हलवल्यानंतर राज्यात आजवर पर्यायी व्यवस्था का निर्माण झालेली नाही? हे महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. मराठवाड्यासारख्या प्रचंड विस्तार असलेल्या परिसरात एकही सरकारी मेंटल हॉस्पिटल अद्याप उभे राहू शकलेले नाही, या अपयशासाठी कोण जबाबदार आहे? असा सवालही या मनोरुग्णालयाचा मागोवा घेणाऱ्या डॉ. नीरज देव यांनी उपस्थित केला आहे.
डॉ. नीरज देव
रुग्णालयाचा आराखडा
इमारतीचा आराखडा, रचना आणि त्याची बांधणी ही रुग्णालय डोळ््यासमोर ठेवूनच करण्यात आल्याचा दावा देव यांनी केला आहे. प्रशस्त प्रवेशद्वार, सुरक्षा रक्षक-गार्ड यांच्यासाठी आसनव्यवस्था, एका खोलीत २० ते २५ रुग्णांच्या खाटा, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आराम कक्ष, रुग्णालयात भर्ती होणाऱ्या रुग्णांच्या फाईलींसाठी वेगळी खोली, स्वयंपाक घर असे सुनियोजित बांधकाम आजही काहीअंशी दिसून येते. रुग्णालयाची तहान भागविण्याची जबाबदारी दोन विहिरींवर होती. त्यापैकी एका विहीरीचे पाणी फक्त पिण्यासाठी तर दैनंदिन कामासाठी एक विहीर होती.
जालन्याचे रुग्णालय सरस
डॉ. नीरज देव यांनी १९९०-९८च्या दरम्यान देशभरातील २० हून अधिक रुग्णालयांना भेटी दिल्या. तेथील खडा-न्-खडा माहिती घेतल्यानंतर मध्य महाराष्ट्रातील जालना येथे उभारलेले रुग्णालय त्या काळातही सरसच होते, असे ते म्हणाले. तत्कालीन गरज, सामाजिक परिस्थिती आणि रुग्णालयाची यंत्रणा या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास डॉ. देव यांनी केला.
निजामाची बेगम मनोरुग्णालयात !
हैद्रराबादचा निजाम अलिशान आयुष्य जगत होते. निजामाच्या ५० बेगम होत्या. यापैकी एक बेगमला उपचारासाठी जालना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात भर्ती करताना या बेगमकडे कित्येत तोळे सोने होते. विशेष म्हणजे निजामाच्या बेगमला मनोरुग्णालयात दाखल केल्यानंतर परिसरात निजामाची बेगम मनोरुग्णालयात अशी जोरदार चर्चा दबक्या आवाजात रंगली होती.
मनोरुग्णांना ९ वर्ष तुरुंगवास
जालना येथील प्रादेशिक मनोरुग्णालय १९५३ मध्ये हैद्रराबाद येथे हलवण्यात आले. यासाठी सरकारी गाड्या, ट्रक, टेम्पो रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला. हैद्रराबाद मध्ये बराकमध्ये मनोरुग्णांना ठेवण्यात आले. दरम्यान जालना ते हैद्रराबाद प्रवासादरम्यान अनेक रुग्ण गहाळ झाले. साधारणपणे १९६२ साली हैद्रराबाद येथे रुग्णालयाचा पाया भरणी केल्याची माहिती समोर येत आहे.