गजानन दिवाण/ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 27 - मध्य व पश्चिम भारतात आढळणाऱ्या एका नव्या पालीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले असून या पालीला ‘सिर्टोडक्टलस वरद गिरी’ असे मराठी नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क, मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील अमरावती, चंद्रपूर परिसरात ही पाल सापडते. तब्बल १३० वर्षांनंतर देशात या पालीचे दर्शन झाले आहे. अमेरिकतील व्हिलनोव्हा विद्यापिठातील डॉ. इशान अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात बंगळूरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायलॉजकिल सायन्सेसचे झिशान मिर्झा, अनुराग मिश्रा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सौनक पाल आणि व्हिलनोव्हा विद्यापीठातील डॉ. अरूण बौर यांच्या पथकाने तब्बल सहा वर्षे या पालीचा अभ्यास केला. शुक्रवारी यासंदर्भातील पेपर ‘झुटाक्सा’ या सायंटिफिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे. ही पाल सहा सेंटीमीटरपर्यंत वाढते. विशेषत: जंगलात आढळणारी ही पाल दिवसा पाला-पाचोळा किंवा दगडाखाली राहते आणि केवळ रात्री बाहेर पडते. ही पाल पावसाळ्यातच ब्रीडिंग करते.
महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेशातील एका परिसरात या पालीची नोंद झाली आहे. जगभराचा विचार केल्यास पालीची ही पोटजात आग्नेय आशिया, श्रीलंका आणि भारतात सापडते. देशात पालीच्या साधारण २९० प्रजाती आढळतात. या नव्या संशोधनाने यात आणखी एकाची भर पडली असल्याची प्रतिक्रिया बंगळूरू येथील ‘नॅशनल सेंटर फॉर बायलॉजकिल सायन्सेस’चे वरद गिरी यांनी ‘लोकमत’ला दिली. मराठी नावच का?कोल्हापूर जिल्ह्यातील राजगोळी या गावात जन्मलेल्या वरद गिरी यांच्या नावाने या पालीचे बारसे करण्यात आले आहे. गिरी सध्या बंगळूरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायलॉजकिल सायन्सेसमध्ये कार्यरत असून सरपटणाऱ्या प्राण्यांवर गेल्या २० वर्षांपासून ते काम करीत आहेत. त्यांनी स्वत: आतापर्यंत ३५ प्रजातींचा शोध लावला आहे. त्यांचे नाव या पालीला देऊन त्यांच्या कार्याला या संशोधकांनी सलाम केला आहे. याआधीही जर्मनीच्या संशोधकाने शोधलेल्या सापाला आणि पश्चिम घाटात एका पालीला वरद गिरी यांचे नाव देण्यात आले आहे.