कोल्हापूर : शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी मुद्रेचा अमीट छाप शिवप्रेमींच्या मनावर उमटलेली आहे. मात्र, शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकासमयी दुसरी मुद्रा तयार करून घेतली होती. आजवर अप्रकाशित राहिलेल्या या मुद्रेचा शोध घेण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. या मुद्रेमुळे शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहास संशोधनाला चालना मिळणार आहे, अशी माहिती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, कोल्हापूर पुरालेखागारातील व शाहू संशोधन केंद्रातील अस्सल कागदपत्रांचा अभ्यास करताना करवीर छत्रपती घराण्यातील मुद्रा उमटवलेल्या कागदपत्रांचा शोध लागला. या ऐतिहासिक कागदांवर इ.स. १८६६ पर्यंत करवीर छत्रपतींच्या गादीवर आलेल्या सर्व छत्रपतींच्या मुद्रा आणि मर्यादा मुद्रा उमटवलेल्या आहेत. त्यात शिवछत्रपतींचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबार्इंचे पुत्र शिवाजी महाराज (पहिले) आणि त्यानंतरच्या सर्व सर्व छत्रपतींच्या मुद्रा असून, शिवरायांची नात स्नुषा करवीर जिजाबाई साहेबांचीही मुद्रा व मर्यादा मुद्रेचाही समावेश आहे. या कागदावर शिवछत्रपतींची आजपर्यंत अप्रकाशित असणारी मुद्रा व मर्यादा मुद्रा उमटवलेली आहे. ही शिवछत्रपतींची मुद्रा अष्टबुर्जी असून यात ‘श्री महादेव श्री तुळजाभवानी शिवनृपरुपेणोर्वीमयवतीर्णोय: स्वयं प्रभु र्विष्णु: एषा तयीद मुद्रा भूबळयस्याभयप्रदा जयति’ असा संस्कृत श्लोक कोरला आहे. या श्लोकाचा मराठी अनुवाद ‘श्री शिवरायांच्या रूपामध्ये पृथ्वीवरती अवतीर्ण झालेले हे स्वत: (श्री) विष्णूच होत. ही त्यांची मुद्रा भूतलाला अभय देणारी आहे, तिचा जयजयकार’ असा आहे. या कागदपत्रांच्या तक्त्यामध्ये या मुद्रेस ‘महादेव मुद्रा’ म्हटले आहे. शिवछत्रपतींच्या या मुद्रेची मुद्रावस्तू म्हणजे ज्याच्या आधारे ही मुद्रा उमटवली जाते, त्या वस्तू आजपर्यंत मिळालेल्या नाहीत. पण ही शिवाजी महाराजांची नवीन मुद्रा व मुद्रावस्तू व कागदावर उमटवलेल्या मुद्रा व मर्यादा मुद्रांची ‘मुद्रावस्तू’ या करवीर छत्रपतीच्या खजिन्यात आहेत. या मुद्रावस्तू व त्यावरून उमटवलेल्या शिक्क्यांची छायाचित्रे करवीर रियासतकार इतिहास संशोधक स. मा. गर्गे यांनी संपादित केलेल्या करवीर रियासतीची कागदपत्रे खंड पहिलामध्ये छापलेली आहेत. शिवाजी महाराजांची ही दुसरी मुद्रा व मर्यादा मुद्रांचे संशोधन शोध पूर्ण होण्यास कोल्हापूर पुरालेखागारचे साहाय्यक संचालक गणेश खोडके, मोडीलिपी तज्ज्ञ अमित आडसुळे, देविका पाटील, ऊर्मिला चव्हाण, मकरंद ऐतवडे यांचे सहकार्य लाभले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या मुद्रेचा शोध
By admin | Published: June 09, 2014 3:18 AM