मुंबई : उरण येथे दिसलेल्या चार कथित दहशतवाद्यांचा ठावठिकाणा न लागल्याने नौदलाने आपले शोधकार्य थांबविले असून, इतर यंत्रणांनी मात्र चौकशीसत्र सुरूच ठेवले आहे़ उरणसह संपूर्ण मुंबई परिसरात नाकेबंदी करत कसून तपास करण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यात अफवांचे पीक आल्याने यंत्रणा हैराण झाली आहे. दहा महिन्यांपूर्वी उरण परिसरात काडतुसे असलेली पेटी आढळली होती. त्यानंतर गुरुवारी दोन शाळकरी विद्यार्थ्यांना चार-पाच संशयित दहशतवादी दिसल्याच्या चर्चेने उरण पुन्हा चर्चेत आले आहे. हे संशयित दहशतवादी समुद्रमार्गे घुसल्याची शक्यता असल्याने सागरी पोलिसांच्या सात बोटी किनाऱ्यावर गस्त घालत आहेत. त्यांच्याकडून शहराच्या संपूर्ण किनारपट्ट्या, जेट्टींचीही तपासणी करण्यात येत आहे. मात्र अद्याप काहीही हाती लागलेले नाही. अशात उरणमध्ये रहिवाशांच्या अडथळ्यांचाही सामना तपास पथकांना करायला लागला.उरणमधील शाळेमध्ये जात असलेल्या मुलांनी काही संशयितांना पाहिल्यानंतर नौदलासह पोलीस आणि सर्व सुरक्षा यंत्रणांनी ‘हाय अलर्ट’ जारी करत तपास सुरू केला. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केलेले असतानाही मुंबईसह सर्वत्र अफवांचे अमाप पीक आहे. गिरगाव चौपाटी तसेच कुर्ला परिसरात चार संशयित दिसल्याचा दावा येथील नागरिकांनी केला. शिवडीतील एका इमारतीत अतिरेकी असल्याची अफवा आणि पोलिसांनी केलेल्या आॅपरेशनचे फोटो व्हॉट्सअॅपवरून फिरू लागले. मात्र या इमारतीत मॉक ड्रिल करण्यात आले असून, गिरगाव आणि कुर्ला येथे काही संशयास्पद नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षालाही अनेकांनी फोन करून संशयास्पद हालचाली, वस्तू, व्यक्तींची माहिती दिली. कंटोल रूमला आलेल्या प्रत्येक कॉलला उत्तर देत पोलिसांनी त्या-त्या परिसराची कसून तपासणी केली. तर मुंबतील समुद्रकिनाऱ्यासह गेट वे आॅफ इंडिया, कुलाबा, मंत्रालय, विधान भवन, सर्व मुख्यालये, पोलीस आयुक्तालय, दूतावास कार्यालये, सर्व रेल्वे स्थानके, टर्मिनस, अतिसंवेदनशील ठिकाणांवरील गस्त आणि बंदोबस्तात शुक्रवारी आणखी वाढ करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) >तपास अहवाल पाठवलामुंबईला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. या सर्व प्रकरणाचा अहवाल नवी मुंबई पोलीस आणि राज्यातील तपास यंत्रणांनी तयार करून पोलीस महासंचालक सतीश माथुर यांना पाठविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
(व्यंगचित्रकार - संदीप प्रधान, असिस्टंट एडिटर, लोकमत)