मोबीन खान, वैजापूर (जि. औरंगाबाद)इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून, राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकाने (एनआयए) शनिवारी वैजापूरच्या इम्रान या तरुणास ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीही एनआयएची शोधमोहीम सुरू होती. तपास यंत्रणा प्रकरणाची पाळेमुळे खोदण्याचा प्रयत्न करत आहेत.वयाच्या २६ वर्षांपर्यंत स्थानिक पोलिसांच्या गुन्हा वहीमध्ये नोंद नसलेला इम्रान आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनेशी कसा जोडला गेला? त्याच्या आडून कोण सूत्रे हलवित आहेत? याचा शोध घेतला जात आहे. मित्रांमध्ये ‘ओबामा’ टोपण नावाने ओळखला जाणारा इम्रान शांत व मनमिळाऊ स्वभावाचा आहे. इम्रानला शिक्षणापेक्षा संगणकाची अधिक गोडी लागली होती. तो बहुसंख्य वेळ मोबाइल व कॉम्प्युटरवरच असायचा. २०१४-१५ मध्ये त्याने मुंब्रा (जि. ठाणे) येथे भाड्याने खोली घेऊन, अंधेरी (मुंबई) येथे एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळविली. त्याच दरम्यान, मुंब्रा येथे त्याचे अतिरेकी संघटनांशी सूर जुळल्याचा पोलिसांना संशय आहे. आॅक्टोबरमध्ये त्याने नोकरी सोडून वैजापूर गाठले. तो कॉम्प्युटर व लॅपटॉप दुरुस्तीचे काम करतच होता. तो दिवसभर झोपायचा आणि अख्खी रात्र बंद खोलीत संगणकावर काम करायचा. मित्रांना व नातेवाईकांना भेटल्यानंतर, तो ‘जिहाद’बद्दल सांगायचा. व्हॉटस्अॅप व फेसबुकवरसुद्धा तो त्याचा उल्लेख करत असे. त्याचे अनेकांनी समुपदेशन केले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.एटीएस पथकाने शनिवारी इम्रानला ताब्यात घेतल्यानंतर, दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपासूनच पुन्हा अत्यंत गोपनीय पद्धतीने शहरातील विविध भागांत छापे मारले. शहरात आणखी कोणी संशयित अतिरेकी आहे का, याचा शोध सुरू आहे. इम्रान मुंबईहून परतल्यानंतर तासन्तास आॅनलाइन असायचा, त्याचाही अभ्यास केला जात आहे.
वैजापूरमध्ये दुसऱ्या दिवशीही शोधमोहीम
By admin | Published: January 25, 2016 2:52 AM