जितेंद्र कालेकर, ठाणेराज्य परिवहन सेवेच्या (एसटी) ठाणे विभागाला संपूर्ण नोव्हेंबरमध्ये दोन कोटी ९५ लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यापैकी दिवाळीच्या हंगामी भाढेवाढीवामुळे एसटीच्या गल्ल्यात एक कोटी ४२ लाखांची जादा भर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्या महिनाभरातील कामगिरीचा आढावा ठाण्याच्या विभाग नियंत्रकांच्या कार्यालयात घेण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील सर्व आगारांमधून आलेल्या आकडेवारीनुसार ही बाब स्पष्ट झाली. ५ ते २५ नोव्हेंबर या दिवाळीच्या हंगामात एसटीच्या साध्या बससाठी १० टक्के तर व्हॉल्वोच्या तिकीट दरात २० टक्के वाढ केली होती. जिल्ह्यातील ठाणे डेपो १, ठाणे -२, भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, विठ्ठलवाडी आणि वाडा या आठही डेपोंमधून सुमारे १२५ जादा गाड्या सोडल्या होत्या. शिवाय, कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिस योजना राबविली. प्रवाशांसाठी तत्पर आणि वेळेत गाड्या उपलब्ध करण्यासाठी चालक आणि वाहकांचे उद्बोधन केले होते.महिनाभरात ठाणे विभागाने २१ कोटी ४४ लाख ८६ हजारांची कमाई केली. (गेल्या वर्षी १८ कोटी ४९ लाख ६७ हजारांचे उत्पन्न मिळाले होते.) यंदा यात दोन कोटी ९५ लाख एक हजार रुपयांचे सुमारे १६ टक्के जादा उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये एक कोटी ४२ लाख ६८ हजार इतके उत्पन्न हंगामी भाडेवाढीमुळे एसटीच्या पदरात पडले आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या ठाणे विभागाने हंगामात पाच कोटी ८९ लाख ४३ हजारांचे उत्पन्न मिळविले होते. यंदा ते सात कोटी ३२ लाख ११ हजार झाले असून त्यात एक कोटी ४२ लाख ६८ हजारांची २४.२१ टक्के इतकी वाढ झाली आहे.
हंगामी भाडेवाढ एसटीला फायदेशीर
By admin | Published: December 11, 2015 1:06 AM