मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागलेत. त्यात महायुती असो महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावर बैठकांचे सत्र सुरू आहे. सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरही कोअर कमिटीची बैठक पार पडली. येत्या विधानसभेत भाजपा १५० ते १६० लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे महायुतीचं जागावाटप ठरल्याची शक्यता आहे.
महायुतीच्या जागावाटपात विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षांना देण्याचं सूत्र अवलंबलं आहे. सध्या भाजपाकडे १०५, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे प्रत्येकी ४० हून अधिक आमदार आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या जागा वगळता उर्वरित जागांवर महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये बोलणी सुरू आहेत. त्यात भाजपा १५०-१६० जागा लढण्यावर ठाम आहे तर उरलेल्या १३०-१३५ जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लढवण्यास दिल्या जाऊ शकतात.
भाजपा 'अॅक्शन' मोडवर...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांचे दौरे वाढले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २ दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यात ते नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील विविध विभागातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याशिवाय भाजपाच्या कोअर कमिटीशीही जागावाटप आणि इतर रणनीती यांच्यावर चर्चा करणार आहेत. भाजपानं ज्या जागा धोक्यात आहेत अशाठिकाणी विशेष लक्ष देण्याचंही ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान...?
विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपणार असून तत्पूर्वी निवडणूक होणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाकडून तशारितीने आढावा घेण्यात येत आहे. साधारणपणे १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. नोव्हेंबरच्या १५ ते १९ या तारखांमध्ये २ टप्प्यात मतदान पार पडेल त्यानंतर २१ ते २३ या कालावधीत निकाल घोषित केले जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपाला 'त्या' २५ जागांची चिंता
मागील निवडणुकीत भाजपा १०५ जागा जिंकत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष बनला होता. मात्र यंदाची निवडणूक भाजपाला सोपी नाही. लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीनंतर भाजपाला गेल्यावेळच्या १०५ जागा निवडून आणणंही कठीण आहे. त्यात जिंकण्याचा विश्वास असलेल्या ८५ जागा वगळता इतर २५ जागांवर भाजपानं विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी संघाच्या आणि भाजपाच्या बैठकांमध्ये रणनीती आखली जात आहे.