महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; 'असा' आहे संभाव्य फॉर्म्युला, सपा-शेकापला किती जागा?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 01:12 PM2024-10-15T13:12:16+5:302024-10-15T13:13:51+5:30
लोकसभेत महाराष्ट्रात काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.
मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीची कुठल्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढाई पाहायला मिळणार आहे. त्यात दोन्ही आघाड्यांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आला नाही. महाविकास आघाडीत जवळपास ८० टक्के जागावाटप निश्चित झालं असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीत कोण किती जागा लढवणार याबाबत आकडे समोर आले आहेत. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पत्रकार परिषद घेत जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा करतील.
दिल्लीतील सूत्रांच्या हवाल्याने महाविकास आघाडीतील जागावाटप पूर्ण झालं असून विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून पेच आहेत. लवकरच ते सोडवले जातील असं सांगण्यात येते. महाविकास आघाडीत काँग्रेस ११९, शिवसेना ठाकरे गट ८६ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ७५ जागा, शेकाप ३, समाजवादी पक्ष २ आणि माकप २ जागा दिल्या जातील. जागावाटपाचा हा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. एबीपी माझानं दिल्लीतील काँग्रेसच्या उच्चपदस्थ वर्तुळातील सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली आहे.
आतापर्यंत २२२ जागांवर एकमत झालं असून त्यात मुंबईतल्या १३ जागा ठाकरे गटाला, ८ जागा काँग्रेस, १ समाजवादी पार्टीला देण्याबाबत सहमती झाली आहे. अद्याप मुंबईतल्या ४ जागांवर तिन्ही प्रमुख पक्षात रस्सीखेच आहे. त्यात संभाव्य जागांमध्ये उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे. भाजपाविरोधात एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे यावर तिन्ही पक्षांचं एकमत आहे. अनेक मुस्लीम बहुल जागांवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.
हरयाणातील निकालानंतर काँग्रेस सावध
हरयाणात काँग्रेसची सत्ता येणार असा सर्वच विरोधक दावा करत होते, मात्र प्रत्यक्षात भाजपाने याठिकाणी सलग तिसऱ्यांदा सत्तास्थापन केली. त्यानंतर मित्रपक्षांनी काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभे केले. हरयाणा निकालानंतर आता काँग्रेस नेतृत्वाने सावध भूमिका घेत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेत रणनीती आखली आहे. त्यात जागावाटपावरून वाद टाळा, मुख्यमंत्रिपदावरून पक्षात गटबाजी नको. मविआतील वादग्रस्त मुद्द्यावर चर्चा नको अशा सूचना नेत्यांना हायकमांडने दिल्या आहेत. लोकसभेत महाराष्ट्रात काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.