विश्वासात न घेता वरिष्ठांनी जागा वाटप केले, जागा वाटपावरून काँग्रेसमध्येच अंतर्गत कलह
By दीपक भातुसे | Published: April 11, 2024 11:04 AM2024-04-11T11:04:19+5:302024-04-11T11:04:46+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: काँग्रेसला नको असलेले मतदारसंघ वरिष्ठ नेत्यांनी पदरात पाडून घेतले, तर पक्षाला विजयाची खात्री असणारे मतदारसंघ मात्र सोडून देण्यात आले, अशी भावना काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असून त्याबद्दल पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
- दीपक भातुसे
मुंबई - महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवर आणि केलेल्या जागा वाटपावर पक्षातूनच नाराजी वाढताना दिसत आहे. काँग्रेसला नको असलेले मतदारसंघ वरिष्ठ नेत्यांनी पदरात पाडून घेतले, तर पक्षाला विजयाची खात्री असणारे मतदारसंघ मात्र सोडून देण्यात आले, अशी भावना काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असून त्याबद्दल पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेष म्हणजे मतदारसंघांचे वाटप करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासातच घेतले नसल्याचे समोर आले आहे.
महाविकास आघाडीत मुंबईतील जागा वाटपाची चर्चा करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मुंबई काँग्रेसला विश्वासात घेतले नाही. काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अथवा इतर नेत्यांनी मुंबईच्या जागांबाबत कोणतीच चर्चा केली नाही. उद्धवसेनेने दिलेल्या जागा निमूटपणे काँग्रेसच्या नेत्यांनी मान्य केल्याचा दावा मुंबई काँग्रेसमधील एका नेत्याने 'लोकमत'शी बोलताना केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या या भूमिकेमुळे वर्षा गायकवाड तीव्र नाराज असून मंगळवारी जागा वाटप जाहीर झाल्यापासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. दोन दिवस काँग्रेसचे नेते त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क होऊ शकलेले नाही. विशेष म्हणजे बुधवारी गायकवाड यांनीच मुंबई काँग्रेसच्या बोलवलेल्या बैठकीलाही त्या उपस्थित राहिल्या नाहीत, त्यामुळे ही बैठकही रद्द करावी लागली. जागा वाटपात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबई काँग्रेसचा बळी दिल्याची भावना मुंबई काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.
उत्तर मुंबईची जागा घेऊ नये अशी मागणी मुंबई काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती, मात्र नको असलेली आणि तिथे ताकद नसलेली उत्तर मुंबईची जागा काँग्रेसकडे घेण्यात आली. दक्षिण-मध्य मुंबईत काँग्रेसची ताकद असताना ही जागा उद्धवसेनेसाठी सोडण्यात आल्याने मुंबई काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी आहे.
दुसरीकडे सांगलीच्या जागेसाठी जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासून आग्रह धरला असताना काँग्रेसच्या नेत्यांनी या जागेसाठी विशेष प्रयत्न केले नसल्याची भावना जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. सांगलीत ताकद नसताना उद्धवसेनेने ज्या पद्धतीने सांगलीची जागेसाठी किल्ला लढवला, त्यापुढे काँग्रेसचे नेते कमी पडल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. भिवंडीबाबतही शरद पवार गटाच्या हट्टापुढे काँग्रेसच्या नेत्यांनी नांगी टाकल्याचे काँग्रेसमधील पदाधिकारी सांगत आहेत.
काँग्रेसमधील ही परिस्थिती पाहता महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असला तरी आता काँग्रेसमधील हा अंतर्गत कलह मिटवण्याचे आवाहन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे.