देहूरोड : गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे पर्याय देणाऱ्या साईप्रसाद ग्रुप आॅफ कंपनी या समूहाला मालमत्ता विक्री करुन गुंतवणूकदारांना पैसै परत करण्याची सूचना सेबीने दिली आहे. मुंबई येथील विशेष न्यायालयाने संबंधित कंपनी संचालकांना जामीन देऊन मालमत्ता विक्रीनंतर थकबाकीची सर्व रक्कम संबंधितांना वितरित करण्याबाबत सूचित केले आहे . साईप्रसाद ग्रुप आॅफ कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांना अनेक आर्थिक प्रकारच्या गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करुन देऊन मोठ्या रकमांची उचल केली होती. मात्र सन २०१५ मध्ये सेबीने कंपनीचे हे व्यवहार बेकायदा असल्याची तक्रार केली. सेबीच्या परवानगीशिवाय अशा गुंतवणुकीचा प्रकार बेकायदा असल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. या तक्रारीनंतर कंपनीचे कार्यकारी संचालक व चेअरमन बाळासाहेब भापकर व त्यांचा मुलगा शशांक भापकर यांना अटक करण्यात आली होती. साईप्रसाद समूहाचे १८ राज्यांत २० लाख गुंतवणूकदार कंपनीकडे आहेत. (वार्ताहर) >कंपनीच्या मालकीचे बंगले, शेतजमीन, वाहने यांचीही मोजदाद केली. त्यानंतर सेबीने सर्व मालमत्तेची विक्री करुन गुंतवणूकदारांमध्ये त्याचे विवरण करण्यासाठी विशेष न्यायालयामार्फत व्यवस्था केली.या व्यवहारापासून आर्थिक गुन्हे विभागाला अलिप्त ठेवून न्यायालयाने सेबीला मालमत्ता विकण्याची मुभा दिली. बाळासाहेब भापकर आणि त्यांचा मुलगा शशांक भापकर यांना त्यांच्या मालमत्ता विक्रीसाठी सशर्त विनाहरकत प्रमाणपत्र दिले. न्यायमूर्ती डी.पी.सुराणा यांनी या संचालकांना जामीन मंजूर केला. तसेच कंपनीच्या १३ मालमत्ता वगळून उर्वरित मालमत्तांची विक्री करण्याचा आदेश बजावला. त्यानुसार विक्री करुन गुंतवणूकदारांच्या रकमा परत करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे हरीश राजिवडे व संदीप तरस यांनी सांगितले.
‘साईप्रसाद’ला सेबीचा दणका
By admin | Published: March 02, 2017 1:40 AM