अक्षय चोरगे मुंबई : मुंबईत मंगळवारी पाऊस धो धो कोसळला. त्यानंतर बुधवारीही पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. परंतु तो फोल ठरला. तरीही हवामान खाते आपल्या भाकितावर ठाम होते. पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू राहील. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला. पण गुरुवारीही पावसाने त्यांचा दावा फोल ठरवला. त्यानंतर असे का होते, पावसाचा अंदाज चुकतोच कसा, यावर तर्क-वितर्क सुरू झाले. आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, हवामान तज्ज यांना याबाबत काय वाटते, ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न...‘माहिती सर्वांपर्यंत पोहोचली नाही’हवामान खात्याकडे अत्याधुनिक यंत्रणा सज्ज आहेत. आपल्याकडील ‘फोरकास्टिंग मॉडेल’ हे अत्यंत उच्च दर्जाचे आहे. परंतु त्या यंत्रणेचा वापर करून मिळवलेली माहिती सर्व मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात प्रशासन आणि माध्यमे अपयशी ठरली. त्यामुळेच शहराची परिस्थिती बिघडली. हवामान खात्याकडे अत्यंत उत्कृष्ट प्रकारचे तंत्रज्ञान आहे. त्याच्या साहाय्याने मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाबाबतचे पूर्वानुमान दिले होते. तीन दिवस अगोदर सर्व माहिती महापालिका, राज्य शासन आणि प्रसिद्धिमाध्यमांना दिली होती. या परिस्थतीत सर्वांत मोठी अडचण अशी झाली की, जी माहिती हवामान खात्याने दिली ती माहिती सर्व मुंबईकरांपर्यंत पोहोचली नसावी.पालिका आणि राज्य सरकारला वेळोवेळी अपडेट्स देण्यात आले होते. मुंबई-कोकणात येत्या ४ ते ५ दिवसांत किती पाऊस पडेल, हवामानाची कशी परिस्थिती असेल? याबाबत स्पेशल बुलेटीन काढण्यात आले. आयएमडीच्या संकेतस्थळावर ते शेअर केले. पालिका मुंबईकरांना अलर्ट करते, परंतु या वेळी पालिकेकडून अलर्ट करणारे कोणतेही एसएमएस आले नाहीत, असे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक होसाळीकर यांनी सांगितले. (समाप्त)दूरदर्शन, एफएम, रेडिओ आणि माध्यमांचा वापर करून आम्ही जमेल तेवढी माहिती मुंबईकरांपर्यंत पोहोचवत असतो. मात्र तरीही पावसाबाबतची सर्व माहिती शेवटच्या मुंबईकरापर्यंत पोहोचविण्यात प्रशासन कमी पडले हे खरे आहे. हवामान खात्यामधील कर्मचारी सर्व प्रकारची माहिती सोशल मीडियाच्या साहाय्याने पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतात. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंटरनेटच्या माध्यमातून मुंबईकरांना अलर्ट केले होते.- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक,मुंबई प्रादेशिक हवामान विभाग...त्यांचेही अंदाज चुकतातजागतिक हवामान संस्था आणि हवामान विभागांचे अंदाजही चुकतात. आमच्याकडील तंत्रज्ञान त्यांच्यासारखेच आहे. आपल्याकडील हवामान आणि पाऊस तिथल्यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे काही वेळा थोडे वेगळे उपाय अवलंबविणे गरजेचे असते, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.पूर्वानुमान दिले होतेहवामान खात्याकडे अत्यंत उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. त्याच्या साहाय्याने मंगळवारच्या मुसळधार पावसाचे पूर्वानुमान दिले होते. तीन दिवस अगोदर सर्व माहिती पालिका, राज्य शासन आणि प्रसिद्धिमाध्यमांना दिली होती. परंतु जी माहिती हवामान खात्याने दिली ती मुंबईकरांपर्यंत पोहोचली नसावी, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.संदेश पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्नमंगळवारी मुंबईत झालेल्या पावसाबाबत हवामान खात्याकडून ‘मुसळधार पावसाची शक्यता,’ अशी माहिती देण्यात आली होती. त्यामुळे त्याबाबतचा संदेश पाठविण्यात आला नाही. परंतु त्याबाबतचे प्रसिद्धिपत्रक काढण्यात आले होते. प्रशासनाने सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला.- महेश नार्वेकर, प्रमुख, आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, मुंबई महापालिका‘फोरकास्टिंग मॉडेल’ बदला२८ आणि २९ आॅगस्टला मोठ्या पावसाची तर ३० आॅगस्ट आणि १ सप्टेंबरला जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. प्रत्यक्षात ३० आॅगस्टला पाऊस पडलेला नाही. हवामान खात्याकडे डॉप्लर, रडार आहे. त्याचा वापर होतो की नाही? याची शंका वाटते. भारतीय हवामान खाते अद्ययावत आहे. मात्र येथील हवामान उष्ण कटिबद्ध आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देशात वापरले जाणारे काही तंत्रज्ञान येथे पुरेसे पडत नाही. जर अंदाज योग्य नसतील तर हवामान खात्याला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. - रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ
सलग दुस-यांदा हवामान खात्याचा दावा फोल : बुधवारप्रमाणेच गुरुवारीही संततधार पावसाची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 4:51 AM