नागपूर : तिहेरी तलाक पद्धतीचा मुद्दा देशभरात गाजत आहे. ही पद्धत बंद करण्याला नरेंद्र मोदी ेसरकारने पाठिंबा दर्शविला असतानाच नागपुरातील एका महिलेला तिच्या पतीने टपालाने ‘तलाक’ दिला आहे. अशा अनपेक्षित तलाकमुळे स्वत:चा व दोन लहान मुलींचा सांभाळ कसा करावा, असा गहन प्रश्न या महिलेपुढे उभा ठाकला आहे. तिने या एकतर्फी निर्णयाविरुद्ध राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.नांदेड जिल्ह्यातील परतूर येथे पोलीस दलात असलेल्या मो.अकिल मो.इस्माईल शेख (३६) याने २०१३मध्ये पहिल्या पत्नीला तलाक दिल्यानंतर दुसरा विवाह केला. सुरुवातीला तीन महिने त्यांचा संसार व्यवस्थित सुरू होता. नंतर दुसऱ्या पत्नीला दिवस गेले; पण पतीला मूल नको होते. यावरून सासरच्या लोकांकडून छळ सुरू झाला. यातच तिला एक दिवस माहेरी सोडण्यात आले. मुलीला जन्म दिल्यानंतर नवरा न्यायला आला नाही. त्यामुळे तिच्या आईने तिला सासरी नेऊन सोडले. त्यानंतरही पती व सासरच्या लोकांचा जाच सुरूच होता.ही महिला सांगते, पोलिसांत असल्याचे सांगत पतीकडून वारंवार ‘तलाक’ देण्याची धमकी मिळत होती. तीन वर्षांच्या मुलीसह मला घरात कोंडले जात होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये परतूर येथे पतीसोबत आले. पण सात महिन्यांची गर्भवती असताना माहेरी सोडण्यात आले. मला दुसरी मुलगी झाली. मुलगी तीन महिन्यांची झाली तरी पती घ्यायला आला नाही. एवढेच नव्हे तर, नको ते आरोप करून मला ११ एप्रिल रोजी टपालाद्वारे तलाक पाठविला. माझा कोणताही दोष नसताना व मला माझी बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी तलाक पाठविण्यात आल्याचे या महिलेने सांगितले.पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. मला तलाक मंजूर नाही. मुलींचा उदरनिर्वाह करण्यासाठी साधन नसल्याने मला न्याय मिळावा, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.
दुसरीही मुलगी झाली म्हणून टपालाने पाठविला ‘तलाक’
By admin | Published: April 20, 2017 5:25 AM