मुंबई : राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई होत नाही, म्हणून शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपोषण सुरू ठेवले. दरम्यान, दिवसभर राज्यातील विविध ठिकाणांहून सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी आझाद मैदानात येत दमानिया यांना पाठिंबा दर्शवला.खडसे यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे दमानिया यांनी स्पष्ट केले. सलग दोन दिवस उपोषण केल्याने सकाळी दमानिया यांची प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत त्यांचा रक्तदाब वाढल्याचे निदर्शनास आले. मात्र त्यानंतरही दमानिया यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी महिला कार्यकर्त्यांसह आझाद मैदानात येऊन दमानिया यांची भेट घेतली. शिवाय या आंदोलनात सोबत असल्याची ग्वाही दिली. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनीही गुरुवारी दमानिया यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.रिपाइंकडून खडसे यांची पाठराखणरिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (ए) अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांची पाठराखण केली आहे. खडसे यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झाले नसल्याने त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. आठवले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनीही खडसे यांच्यावर लागलेल्या विविध आरोपांची तत्काळ चौकशी करावी. त्यात ते दोषी आढळलेच, तर त्यांच्यावर नक्की कारवाई करावी. मात्र खडसे यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत कोणतेही संबंध असतील, असे वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, हैदराबादमधील नवाब सय्यद इस्तिकार अली खान यांनी आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंमध्ये प्रवेश केला. याआधी ते कोणत्याही राजकीय पक्षात नव्हते. आठवले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रिपाइंमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती खान यांनी दिली. जागतिक श्रीमंतांची यादी असलेल्या गोल्डन बुकमध्ये खान यांचे आजोबा अब्दुल अख यांचे नाव नोंदले होते. हैदराबाद आणि सिकंदराबाद येथे यशस्वी उद्योगपती आणि नवाब म्हणून त्यांची ख्याती आहे....तर कार्यकर्त्यांवर कारवाईनागपूरमध्ये होणारी कार्यकर्त्यांची बैठक अनधिकृत असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. बैठक घेण्यात काही गैर नाही. मात्र बैठकीनंतर पक्षाच्या विचारसरणीविरोधात कोणतीही चर्चा व्हायला नको. तसे झाल्यास संबंधित कार्यकर्त्यावर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अंजली दमानिया यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
By admin | Published: June 04, 2016 2:57 AM