मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक मंदगतीने सुरू आहे. अमृतांजन पूल ते खोपोली एक्झिट दरम्यान वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मुंबईकडे जाणार्या मार्गावर खंडाळा बाह्य वळण ते खंडाळा बोगदा दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने डोंगरांकडील एक लेन बंद केल्याने दोन लेनवर वाहतुकीचा ताण येत आहे. द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी महामार्ग पोलीस प्रयत्न करत आहेत. पुण्याकडे येताना घाट क्षेत्रात वाहने बंद पडल्यास तातडीने ती बाजुला करण्याकरिता क्रेन सर्व्हिस उपलब्ध केलेली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक मंदगतीने सुरू असतानाच मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे धिम्यागतीने सुरू आहे. चिपळूण येथील लोटे औद्योगिक वसाहतीजवळ टँकर उलटल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.अखेर क्रेनच्या साहाय्याने टँकर हटवण्यात यश आल्याने ठप्प झालेली वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.
शनिवारी व रविवारला जोडून आलेली सोमवारची नाताळाची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्टया आल्यानं लोणावळ्यासह महबळेश्वर, कोल्हापुर भागातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक धिम्यागतीने सुरू आहे. चौथा शनिवार, रविवार आणि ख्रिसमस असे सलग तीन दिवस जोडून सुट्या आल्यामुळे मुंबई, ठाण्यातील अनेक प्रवासी द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबवर रांगा आहेत.