ऑनलाइन लोकमत
बुलढाणा, दि. 6 - चिखली तालुक्यातील डोंगरशेवली शिवारातील शेतात काम करीत असलेल्या दोन तरूणांवर पुन्हा अस्वलाने हल्ला केल्यामुळे त्यांना गंभीर अवस्थेत बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात ६ सप्टेंबर रोजी भरती करण्यात आले. मागिल दोन दिवसात अस्वलाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना घडल्याने डोंगरशेवली परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पृष्ठभूमिवर वनविभागाने परिसरातील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याच उपाययोजना न केल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बुलडाण्यात धाव घेत संबंधित वनविभागाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयावर हल्ला करून संगणकसह कार्यालयाची तोडफोड केली. चिखली तालुक्यातील डोंबरशेवली येथील बबन मोहन चव्हाण वय ३२ व छगन मोहन चव्हाण वय २८ हे दोन्ही भाऊ सकाळी १० वाजता मोटारसायकलीने शेतात जात होते.
दरम्यान शिवारातील पानसरी धरणाजवळ एका अस्वलाने त्यांच्या मोटारसायकलीवर हल्ला करून दोघांना जखमी केले. सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून दोघांना गंभीर जखमी अवस्थेत बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मागिल दोन दिवसात अस्वलाच्या हल्ल्याची दुसरी घटना घडल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुलडाणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयावर हल्ला करून संगणकासह साहित्यांची तोडफोड केली.