पुणे : मजुरीतील दरवाढ व कोरोना विमा कवच या मागण्यांवर काहीच निर्णय होत नसल्याने साखर महासंघ व ऊसतोडणी कामगार संघटना यांच्यातील दुसरी बैठकही निष्फळ ठरली. साखर संकुलात सोमवारी दुपारी ही बैठक झाली. संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, संचालक राजेंद्र नागवडे, ऊसतोड कामगारांचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे, महाराष्ट्र श्रमिक संघटनेचे अध्यक्ष जीवन राठोड, माजी आमदार केशवराव आंधळे, दत्तू भागे, श्रीमंत जायभावे, सुशिला मोराळे, आदिनाथ थोरे व बाबासाहेब गवळी बैठकीला उपस्थित होते.
कोरोना पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांचा ५ लाख रूपयांचा स्वतंत्र विमा काढावा, तसेच कोरोना टाळेबंदीत झालेल्या आर्थिक हलाखीच्या परिस्थितीचा विचार करून मजुरी वाढवून द्यावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य काही मागण्या संघटनांनी केल्या आहेत. त्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामगार हंगामासाठी बाहेर पडणार नाहीत, अशी संघटनांची भूमिका आहे.
कोरोना विम्याचा हप्ता प्रत्येकी ७०० रूपये येतो असे दांडेगावकर यांनी स्पष्ट केले. सरकारकडे त्यांनी हा हप्ता भरावा अशी मागणी केली आहे, मात्र त्यात काही वाटा कामगारांनीही घ्यायला हवा, तो महामंडळाच्या माध्यमातून किंवा संघटना स्तरावर घ्यावा, असे मत व्यक्त केले. मजुरीतील वाढीसाठी सरकारने जलसंधारण मंत्री जयंत पाटील तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा लवाद नियुक्त केला आहे, त्यांच्यासमोर हा विषय आहे, असे दांडेगावकर यांनी सांगितले. गहिनीनाथ थोरे व काही संघटनांनी या लवादालाच विरोध केला. माजी आमदार आंधळे व काही संघटनांनी लवाद मान्य असल्याचे सांगितले. बराच वेळ चर्चा झाल्यावर अखेर दांडेगावकर यांनी यात ज्येष्ठ नेते शरद पवार अंतिम निर्णय घेतील असे स्पष्ट केले. सरकार तसेच पवार यांच्याकडे या संदर्भात संघाने सर्व माहिती दिली आहे. ते लवकरच सर्व संघटनांना बैठकीसाठी बोलावतील. त्यावेळी यावर निर्णय होईल असे दांडेगावकर म्हणाले.