ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. १४ - दुष्काळ आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करणा-या लातूररमध्ये पाणी एक्सप्रेसने दूसरी फेरी पूर्ण केली आहे. बुधवारी रात्री पाच लाख लिटर पाणी घेऊन पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये दाखल झाली. १० वॅगन असलेली पाणी एक्सप्रेस बुधवारी सकाळी मिरजहून निघाली होती. ३५० किमीचे अंतर पार करुन दहा तासांनी पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये पोहोचली.
प्रत्येक वॅगनमध्ये ५० हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज रेल्वे स्थानकात या सर्व वॅगनमध्ये पाणी भरण्यात आले होते. मंगळवारी पहिली पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये पोहोचली होती. ट्रेनमधून येणारे पाणी साठवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लातूर रेल्वे स्थानकाजवळची एक मोठी विहीर ताब्यात घेतली आहे.
लातूरसाठी ही विशेष रेल्वे गाडी आठ एप्रिलला राजस्थानातील कोटा येथून निघाली होती. दुष्काळग्रस्त लातूरमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी ५० वॅगन असलेल्या दोन मालवाहतुकीच्या ट्रेन्स उपलब्ध करुन देण्याचे कोटा वर्कशॉपला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने निर्देश दिले होते. त्यानुसार या ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. या विशेष ट्रेनच्या प्रत्येक वॅगनमध्ये ५४ हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.