मुंबई - दुस-या टप्प्यातील 3700 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले पहिल्या टप्प्याप्रमाणे दुस-या टप्प्यातही बहुतांशी ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. पण सरकारचे अपयश लपविण्यासाठी खोटी आकडेवारी देऊन भाजपची फेकाफेकी सुरू आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
आज निकाल जाहीर झालेल्या बहुतांशी ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या 1063 आणि दुस-या टप्पा मिळून काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून, खोटी आकडेवारी जाहीर करून आपलाच पक्ष सर्वात मोठा असल्याचा खोटा दावा भाजपाने या निवडणुकीच्या निकालानंतरही केला आहे. भाजपाकडून माध्यमांना पुरवण्यात आलेल्या आकडेवारीत भाजपाने अमरावती जिल्ह्यात 150 ग्रामपंचायतीत विजय मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र अमरावती जिल्ह्यात भाजपाने फक्त 36 ग्रामपंचायतीत विजय मिळविला आहे, तर काँग्रेस पक्षाने 140 ग्रामपंचायतीत विजय मिळविला आहे.
आतापर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 52 पैकी 27, अमरावती जिल्ह्यात 249 पैकी 140, सांगली जिल्ह्यातील 452 पैकी 139, पुणे जिल्ह्यातील 221 पैकी 77 ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात ही भाजचा दारुण पराभव झाला आहे. पण वस्तुस्थिती लपवण्यासाठी भाजपाकडून खोटी आकडेवारी दिली जात आहे. दुस-या टप्प्याच्या निकालाची सविस्तर आणि खरी आकडेवारी आम्ही लवकरच जाहीर करू असे सांगतानाच लोकांनी भाजपला दणका दिल्याने भाजपची फेकाफेकी सुरू आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.