मुंबई : राज्यातील व केंद्रातील नाकर्त्या व जनविरोधी सरकारविरूध्द महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्या दुस-या टप्प्याचा शुभारंभ उद्या गुरुवार दि. ४ ऑक्टोबर रोजी फैजपूर जि. जळगाव येथून होणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लिकार्जुन खर्गे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख काँग्रेस नेते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यात्रेत सहभागी होणार आहेत.यासंदर्भात बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपा सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट वारंवार खोटे बोलून जनतेची फसवणूक व विश्वासघात केला आहे. शेतकरी,कष्टकरी, दलित, अल्पसंख्यांक,महिला, विद्यार्थी, तरूण असे सर्वच घटक सरकारवर नाराज आहेत. मराठा, मुस्लीम, धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करित आहेत. संपूर्ण महाराष्ट्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. राज्यातील जनतेच्या हक्कासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या जनविरोधी धोरणांबाबत जनजागृती करून भाजपा- शिवसेना सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी हा जनसंघर्षाचा दुसरा टप्पा आहे, असे चव्हाण म्हणाले.१९३६ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे झाले होते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासह काँग्रेसचे त्या काळातील सर्वच ज्येष्ठ नेते या अधिवेशनास उपस्थित राहिले होते. त्याच पावन धर्तीवरून जनसंघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याचा शुभारंभ होणार आहे. दुस-या टप्प्यात ही यात्रा उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे,नंदुरबार, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधत पुढे जाईल व ९ ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथे विशाल जाहीर सभेने या यात्रेचा समारोप होणार आहे.
भाजपा-शिवसेना सरकार उखडून टाकण्यासाठी जनसंघर्षाचा दुसरा टप्पा - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 17:19 IST