मुंबई : वडाळा ते जेकब सर्कल (सातरस्ता) या महत्त्वपूर्ण मार्गावरील मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे़ रविवारी सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात येईल. मे २०११ मध्ये हा टप्पा सुरु करण्याची मुदत होती़ विविध कारणांमुळे हा टप्पा सुरु होण्यास प्रत्यक्षात २०१९ उजाडले. १०.६ किमी अंतराचा हा टप्पा सुरु झाल्यानंतर मोनोरेलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
एमएमआरडीए ने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात १५० कोेटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये मोनोचे व्यवस्थापन व देखभाल खर्चासाठी तरतूद करण्यात आली आहे. पुढील वर्षी पर्यंत मोनोरेलसाठी नवीन १० रेक्स घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांनी दिली. याबाबत निविदा प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
२०१८ च्या सुरुवातीला मोनोरेलचे दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही केवळ पुरेसे रेक्स उपलब्ध नसल्याने ही सेवा सुरु करण्यात आली नव्हती. या महिन्याभरात किमान आणखी २ रेक्स वापरात आणता येतील, असा एमएमआरडीएचा विश्वास आहे. सध्या चार रेक्सच्या माध्यमातून मोनोरेलच्या पहिल्या टप्प्याची वाहतूक चेंबूर ते वडाळा मार्गावर चालवण्यात येते. सध्या दरदिवशी मोनोरेलद्वारे प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या सुमारे १८ हजार आहे. १९.५ किमी अंतराच्या पूर्ण मार्गावर सेवा सुरु झाल्यावर मोनोरेलच्या प्रवासी संख्येमध्ये लक्षणीय वाढ होईल व ही संख्या किमान १ लाख पर्यंत जाईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मोनोरेलचा पहिला टप्पा अपयशी ठरला असल्याने मोनोरेल यशस्वी होण्यासाठी दुसºया टप्प्यावर विशेष लक्ष आहे. दुसरा टप्पा सुरु झाल्यानंतर मोनोरेलला चांगला प्रतिसाद मिळेल व हा प्रकल्प यशस्वी होईल, असा दावा अधिकाºयांनी केला आहे. सध्या रेल्वे नेटवर्कपासून दूर असलेल्या भागांमध्ये मोनोरेल धावणार असल्याने मोनोरेलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.५ ते ११ रुपये तिकिटाचे सध्या दर असून त्यामध्ये १० ते ४० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये मोनोच्या पहिल्या टप्प्यातील डब्याला लागलेल्या आगीनंतर ही सेवा स्थगित करण्यात आली होती. डिसेंबर २०१८ मध्ये एमएमआरडीए प्रशासनाने ही सेवा आपल्या ताब्यात घेतली आहे.मोनो स्थानकांच्या नामकरणाची मागणी, समितीचा अहवाल आल्यानंतर होणार निर्णयजीटीबी नगर, वडाळा ब्रिज, अॅणटॉप हिल व दादर पूर्व या मोनोच्या चार स्थानकांचे नामकरण करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आली आहे. या मागणीवर विचार करण्यासाठी मुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन केली आहे. या समितीच्या दोन बैठका झाल्या असून अद्याप समितीने आपला अहवाल सादर केलेला नाही.समितीच्या अहवालानंतर या स्थानकांचे नाव बदलण्याच्या मागणीबाबत निर्णय होण्याची शक्यता अधिकाºयांनी वर्तवली आहे.अॅण्टॉप हिल स्थानकाला शेख मिस्त्री, दादर पूर्व स्थानकाला विठ्ठल मंदिर, वडाळा ब्रिज स्थानकाला नाना फडणवीस यांचे नाव देण्याची मागणी आहे. तर, जीटीबी नगर स्थानकाला त्रिमुर्ती शिव, हुतात्मा करुपय्या देवेंद्र यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.