लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठीचा प्रचार आज संपणार आहे. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक सनसनाटी दावा केला आहे. त्यामुळे भाजपासह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे वडील आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी एका सभेला संबोधित करताना सांगितले की, २८ मे २०२३ रोजी सुजय विखे पाटील आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटले. त्यानंतर ५ जून २०२३ रोजी राधाकृष्ण विखे पाटील आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली. भाजपाचे नेते काँग्रेसच्या नेत्यांना भेटताहेत आणि काँग्रेसवाले गाफील राहिल्यासारखे दिसताहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. या दाव्यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यावरून विखेंचे विरोधक असलेले बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला आहे. राधाकृष्ण विखेंकडून पुन्हा एकदा काँग्रेसकरिता धडपड सुरू झाली आहे, असं माझ्या कानावर आलं होतं. कुणाची सत्ता येणार हे त्यांना सर्वांच्या आधी लवकर कळतं, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यानुसार त्यांनी आतापर्यंत पक्षांतरं केली आहेत. मागच्या २०-२५ वर्षांत ५-७ वेळा त्यांनी अशी पक्षांतरं केलेली आहेत. कार्यकर्त्यांसाठी काही धोक्याची घंटा वगैरे काही नाही. मला विचारल्याशिवाय काही होणार नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे. ‘बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अशी बेजबाबदार विधानं करणं योग्य नाही’. यावेळी विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, ज्या जिल्ह्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करता त्या जिल्ह्यात तुम्ही काँग्रेसची एकही जागा आणू शकला नाहीत, स्वत:चं अपयश मान्य करा ना. वास्तविक मी मागे बोललो होतो की, भाजपामध्ये जाण्यासाठी ते उत्सुक होते. त्यांची कुणासोबत गुप्तभेट झाली, कुणासोबत चर्चा केली. हे मी सध्यातरी जाहीर करणार नाही. परंतु विधान परिषद निवडणुकीपासून त्यांची भाजपाकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र ती का थांबली, याचा खुलासा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून करावा लागेल, असे विधान विखे पाटील यांनी केले.