मुंबई : स्वत:च्या मतदारसंघाबद्दल अवाक्षरही न काढता, सारा महाराष्ट्रच माझ्यासाठी एक मतदारसंघ असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाळ्याही मिळविल्या आणि ते लढणार कोठून याची उत्सुकताही कायम ठेवली.बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मनसे आ. प्रवीण दरेकर यांच्या विधानसभेतील भाषणांच्या पुस्तकाचे प्रकाशन राज यांच्या हस्ते झाले. या वेळी राज बोलत होते. लोकसभा निकालानंतरच्या जाहीर सभेत राज यांनी स्वत: उमेदवार होण्याची घोषणा केली. त्यानंतर राज यांच्या मतदारसंघाबद्दलची चर्चा सुरू झाली. हाच धागा पकडत राज म्हणाले, अनेक जण मतदारसंघाबद्दल विचारतात. पण, सारा महाराष्ट्रच माझा मतदारससंघ आहे. केवळ एका मतदारसंघाचा आमदार बनण्यात मला रस नाही. प्रत्येक जण केवळ आपल्या मतदारसंघापुरता पाहतो आहे. हे बदलायला हवे, असे राज म्हणाले.या वेळी राज यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनाही टीकेचे लक्ष्य केले. मुंबई पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेत उमेदवारांना ५ किलोमीटर धावायला लावणारे गृहमंत्री आर.आर. पाटील १०० मीटर तरी धावू शकतील का, असा खोचक सवाल त्यांनी केला. या भरतीसाठी मुलांना मुंबईत बोलवायची काय गरज आहे, हे तरुण कुठल्यातरी कोपऱ्यातून एसटीतून येतात, पोटात अन्नाचा कण नसतो आणि इथे त्यांना ५ किलोमीटर धावायला लावतात. पोलीस भरतीची परीक्षा जिल्हा पातळीवरही होऊ शकते, असे राज म्हणाले.राज्यात बदल घडवायचा असेल तर आधी व्यवस्था बदलावी लागेल. ती आपण बदलू शकतो असे सांगतानाच, माझ्या हातात सत्ता द्या, सुतासारखा सरळ करतो. याचा अर्थ मी सूत घेऊन ते सरळ करत बसणार नाही, तर जे कायदे बाद झाले आहेत, ते बाजूला करण्याची आणि नवीन गरज असल्याचे राज म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
राज ठाकरे यांच्या मतदारसंघाचे गुपित कायम
By admin | Published: June 16, 2014 3:48 AM