पुणे : फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)चा जगभरात असलेला नावलौकिक... संस्थेमधून प्रतिभावंतांची बाहेर पडलेली फळी... गजेंद्र चौहानांच्या नियुक्तीमुळे मध्यंतरीच्या काळात आंदोलनाच्या माध्यमातून लागलेले गालबोट... असा कडू-गोड इतिहास असलेल्या संस्थेविषयी कुतूहल निर्माण झाल्यामुळे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल संस्थेमध्ये एक तास रमले. हॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग ज्या कॅमेऱ्याने केले जाते तो अडीच कोटी रुपयांचा कॅमेरा इथे आहे आणि तो विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी दिला जातो हे कळल्यावर तर ते थक्कच झाले! एफटीआयआयच्या वैभवाने ते इतके भारावून गेले, की या संस्थेमध्ये येणे म्हणजे तीर्थयात्रा करण्यासारखे आहे, अशा शब्दांत त्यांनी संस्थेविषयी गौरवोद्गार काढले. संस्थेमध्ये काय बदल होणे अपेक्षित आहे, हे जाणून घेण्यासाठी एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला, विविध विभागप्रमुख यांच्यासमवेत मित्तल यांची बैठक झाली. दोन महिन्यांपूर्वी सचिवपदाची सूत्रे हाती घेतलेल्या मित्तल यांनी एफटीआयआयच्या परिसरात एक तास घालवत साऊंड, एडिटिंग आदी विभागात जाऊन कामाची माहिती घेतली. हॉलिवूडच्या शूटिंगसाठी वापरला जाणारा अडीच कोटी रुपयांचा कॅमेरा त्यांना दाखविण्यात आला आणि ते थक्कच झाले, हॉलिवूडचे चित्रपटही एडिट होऊ शकतात, अशी सक्षम एडिटिंग यंत्रणा इथे आहे, हे ऐकून ते भारावून गेले. यापेक्षा मोठी गोष्ट विद्यार्थ्यांसाठी अजून काय असू शकते, इतक्या शैक्षणिक सोयी-सुविधा असतानाही आंदोलन करण्याची वेळ येणे हे दुर्दैवी आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. संस्थेचे ग्रंथालय अद्ययावत करण्यासंबंधीचा प्रस्ताव विभागप्रमुखांनी मांडला. या प्रस्तावाचे कौतुक करीत निधीची गरज असल्यास केंद्राकडून नक्कीच सहकार्य मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. >एफटीआयआयमध्ये पूर्वी जे काही वाईट घडले त्याचा खेद वाटतो. ते विसरून संस्थेला पुन्हा नववैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. - अजय मित्तल सचिव, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय
सचिव रमले एफटीआयआयमध्ये
By admin | Published: August 24, 2016 1:15 AM