मुंबई : मालवणी दारूकांडातील आरोपींविरोधात शुक्रवारी गुन्हे शाखेने हत्या व हत्येचा प्रयत्न ही कलमे वाढवली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी दंडाधिकारी न्यायालयाला दिली. न्यायालयाने सर्व आरोपींना २४ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.या प्रकरणात हत्येचे कलम वाढविण्याबाबत काही दिवसांपासून कायदेशीर बाबी चाचपल्या जात होत्या तर दुसरीकडे भक्कम पुराव्यांचा शोधही सुरू होता. अखेर, आरोपींनी कट रचून दारूकांडात ठार झालेल्यांची हत्या केली हा आरोप स्पष्ट करणारे पुरावे हाती आले. त्यामुळे ही गंभीर कलमे वाढवण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला दिली.या गुन्ह्यात अटक आरोपी फ्रान्सीस डीमेलो याच्या घरातून गुन्हे शाखेने सुमारे हजार लीटर विषारी दारू हस्तगत केली होती. त्यातील नमुन्यांची तपासणी केली असता ही गावठी दारू नसून त्यात ९६ टक्के मिथेनॉल असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. गावठी समजून मिथेनॉल पिणारा दगावू शकतो, हेही त्यांना माहीत होते. त्यामुळे यातून आरोपींचा हेतू सिद्ध होतो, असा दावा गुन्हे शाखा करते. (प्रतिनिधी)
दारूकांडाच्या गुन्ह्यात हत्येचे कलम
By admin | Published: July 11, 2015 2:21 AM